शेतकऱ्याच्या मोबाईल वरून Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी; गीतकाराला अटक

89
शेतकऱ्याच्या मोबाईल वरून Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी; गीतकाराला अटक
  • प्रतिनिधी 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागणारा ‘मै सिकंदर हु’ या गाण्याच्या गीतकाराला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. या गीतकाराने धमकी देण्यासाठी कर्नाटकातील एका शेतकऱ्याचा मोबाईल फोनचा वापर करण्यात आला होता असे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या पाशाला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : निवडणुकीपूर्वीच आमदारांनी खर्च केले महापालिकेचे ६५० कोटी रुपये)

सोहेल पाशा (२४) असे अटक करण्यात आलेल्या गीतकाराचे नाव आहे. सोहेल पाशा हा गीतकार असून त्याने ‘मै सिकंदर हु’ हे गाणे लिहून युट्युबवर टाकले आहे. ७ नोव्हेंबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन व्हॉट्सॲपवर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज पाठविण्यात आला होता. धमकी देणाऱ्याने मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत सलमान खान आणि ‘मै सिकंदर हु’ या गाण्याच्या गीतकाराला महिनाभरात ठार मारण्याचा इशारा देत ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. पोलिसांच्या तपासात ज्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला तो मोबाईल क्रमांक कर्नाटक राज्यातील रायचूर येथून आल्याचे निष्पन्न झाले होते.

(हेही वाचा – मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे राज्याचा विकास करू शकत नाही; PM Narendra Modi यांची टीका)

गुन्हे शाखेने कर्नाटक येथे जाऊन मोबाईल धारकाचा शोध घेतला असता सदर मोबाईल क्रमांक रायचूर येथील शेतकरी व्यंकटेश नारायण दासर (५०) याचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता हा धमकीचा मेसेज करणारा सोहेल पाशा हा असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेने सोहेल पाशा याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सोहेल पाशा या यूट्यूबरने ‘मै सिकंदर हूँ’ नावाचे गाणे लिहिले आणि ते यूट्यूबवर पोस्ट केले. यानंतर त्याने रायचूर येथील व्यंकटेश नारायण दासर या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर वापरून त्याच्या फोनवर व्हॉट्सॲप ऍक्टिव्हेट केले आणि मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेज पाठवला, असे तपासात समोर आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पथक रायचूरमध्ये तपास करत होते. आरोपी सोहेल पाशा हा टायर कंपनीत काम करत होता आणि त्याने स्वतःचे यूट्यूब चॅनलही सुरू केले होते. मुंबई क्राईम ब्रँचने सोहेल पाशाला अटक करून वरळी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Salman Khan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.