- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्स फ्रँचाईजीने के. एल. राहुलला (K. L. Rahul) आपल्याकडे कायम राखलं नाही ही मोठी बातमी होती. ज्या ३ कर्णधारांना फ्रँचाईजींनी सोडलं त्यातील एक राहुल होता. पण, रिषभ पंत प्रमाणेच राहुलही असा खेळाडू होता ज्याने स्वत:हून फ्रँचाईजीची साथ सोडली होती. त्या सगळ्या प्रकरणावर आता के. एल. राहुलने पहिल्यांदा खुलेपणाने वक्तव्य केलं आहे. राहुलने साथ सोडल्यानंतर संघमालक गोयंका यांनी आणखी एक स्फोटक विधान केलं होतं. ‘आम्हाला विजयासाठी खेळणारे खेळाडू हवेत,’ असं गोयंका म्हणाले होते.
‘गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली त्या आधीच माझा निर्णय झालेला होता. मला इतर पर्यायांचा विचार करावासा वाटला. मला नव्याने सुरुवात करायची आहे. मला तणावमुक्त आणि हलकं वातावरण असलेली ड्रेसिंग रुम हवी आहे. म्हणूनच मी नवीन पर्याय शोधत आहे,’ असं राहुलने (K. L. Rahul) बोलून दाखवलं आहे.
(हेही वाचा – राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवे; Giriraj Singh यांचा आरोप)
राहुल (K. L. Rahul) गेली ३ वर्षं लखनौ फ्रँचाईजीबरोबर आहे. पहिल्या हंगामात त्याने ६०० च्या वर धावा केल्या होत्या आणि त्याबरोबरच संघालाही बाद फेरीत दिमाखात नेलं होतं. पण, २०२३ चा हंगाम त्याच्यासाठी मूळातच दुखापतींचा होता. भारतीय संघातही तो नियमित खेळू शकला नव्हता आणि २०२४ मध्येही त्याची कामगिरी अनियमित होती. या सगळ्याचा परिणाम राहुल आणि संघ मालक संजीव गोयंका यांच्यातील संबंधांवर झाला. आणि एका आयपीएल सामन्यानंतर दोघांमध्ये भांडण झालेलंही दिसलं.
आता दिलेल्या मुलाखतीत राहुलने (K. L. Rahul) संघातील वातावरण कसं हवं याविषयीही सांगितलं आहे. ‘ड्रेसिंग रुममधलं वातावरण मोकळं आणि हलकं हवं. विजय सगळ्यांनाच हवा असतो. पण, पराभव स्वीकारणारंही वातावरण हवं. चेन्नई सुपरकिंग्ज, गुजरात टायटन्समध्ये तसं वातावरण होतं. आम्ही गंभीर, लँगर आणि अँडी फ्लॉवर असताना लखनौमध्येही तसंच वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आता ते शक्य होत नाहीए, असं शेवटी राहुलने बोलून दाखवलं.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community