एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील सभा रद्द झाल्याने मनसैनिक नाराज असताना शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी भिवंडीतील सभाही राज यांच्या भाषणाविनाच झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी ग्रामीणच्या उमेदवार वनिता कथोरे, भिवंडी पूर्वचे उमेदवार मनोज गुळवी, शहापूरचे उमेदवार हरिश्चंद्र खांडवी, विक्रमगडचे उमेदवार सचिन शिंगडा यांच्या प्रचारार्थ भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर शुक्रवारी ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
(हेही वाचा बांगलादेशात ISKCON वर बंदी घातली नाही, तर हत्याकांड सुरूच राहणार; मौलवीचा युनूस सरकारला इशारा)
अस्वस्थ वाटत असल्याकारणाने राज ठाकरेंनी व्यासपीठावर न जाता थेट मनसे कार्यकर्ते व महिला सैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटे बोलून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत हे उमेदवार विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नक्की परत येईल, असे आश्वासन मनसे कार्यकर्त्यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे प्रचार सभेसाठी मनसेला मिळणार की उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाला मिळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर या सभेसाठी मनसेला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु सभेला परवानगी मिळूनही १७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आले. (Raj Thackeray)
Join Our WhatsApp Community