वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांसाठी Election Commission कडून इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर दक्ष

42
वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांसाठी Election Commission कडून इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर दक्ष

महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग (Election Commission) तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) होणार आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूर, दृश्य, बातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

(हेही वाचा – गंगा नदीत सुहासिनींचे कुंकू पुसत पाद्रीकडून Hindu महिलांचे सामूहिक धर्मांतर)

मतदान दिनी तसेच मतदानाच्या एक दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्त्वाच्या घटना, आचारसंहितेचा भंग, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे तत्काळ दखल घेतली जाणार असून त्याबाबतचा कृती अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पाठविण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र संदर्भातील बैठक शुक्रवारी मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवी, कक्ष अधिकारी विवेक जगदाळे, कक्ष अधिकारी कल्पना कारंडे, क्षेत्रीय कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.