Bitcoin आणि ट्रेडिंगसाठी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणाऱ्या लिंकपासून सावधान

33

आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून ‘बिटकॉईन (Bitcoin) आणि ट्रेडिंग’ संदर्भात लिंक टाकून त्या मार्फत व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये जोडून फसवणूक करण्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय सायबर माफियाकडून सुरू आहे. अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणाऱ्या अनोळखी लिंक नागरिकांनी उघडू नये, असा इशारा महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर लिंक पाठवले जातात 

बिटकॉइन (Bitcoin) आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून लोकांची फसवणूक झाल्याची किंवा मोठ्या रकमा गमावल्याची अनेक प्रकरणे पोलिसांत नोंदवली गेली आहेत. ‘बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक तसेच ट्रेडिंग करण्यात इच्छुक असाल तर या लिंकवर क्लिक करा’, या प्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणात अनेकांना व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर लिंकसह पाठवले जात आहे. अनेक जण या लिंक वर क्लिक करताच एका ग्रुपमध्ये त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक ऍड केला जातो. ग्रुपमध्ये असणारे इतर मेम्बर क्रिप्टोकरन्सी आणि ट्रेंडिग संदर्भात चर्चा करतात आणि त्यात कुणाला किती नफा झाला हे सांगत असतात. या चर्चेला बळी पडणाऱ्या व्यक्तीला ग्रुपमध्ये हेरले जाते आणि त्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याची आर्थिक फसवणूक करण्यात येते.

नायजेरियन टोळ्यांचा सहभाग 

सायबर फसवणुकीत नायजेरियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, त्यानंतर चीनमधून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आणि भारतातील राजस्थान, झारखंड, उत्तरप्रदेश या राज्यातील सीमेवरील गावांमधून हा अवैध प्रकार सुरू झाला. लॉटरी लागल्याचा ई -मेल पाठवून ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगण्याचा प्रकार सर्वात प्रथम सुरू झाला होता. या फसवणुकीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन टोळ्या सामील होत्या, तसेच (Bitcoin) क्रिप्टो करन्सी फसवणुकीमध्ये देखील नायजेरियन टोळ्या सामील होत्या, नायजेरियन टोळ्यांनी काही भारतीय नागरिकांना हाताशी धरून किंवा पैशांचे आमिष दाखवून या फसवणुकीत सामील करून घेतले होते, अशी माहिती सायबर सेलच्या एका अधिकारी यांनी दिली.

(हेही वाचा गंगा नदीत सुहासिनींचे कुंकू पुसत पाद्रीकडून Hindu महिलांचे सामूहिक धर्मांतर)

कोणत्या क्रमांकावरून येतात मेसेज? 

बिटकॉईन (Bitcoin) आणि इतर ट्रेडिंग गुंतवणूक संदर्भात +234 ने सुरू होणारे आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अनेकांना मेसेज सोबत लिंक पाठवून त्यांना व्हॉट्सअॅप, टेलिग्राम तसेच फेसबुक ग्रुपमध्ये जोडले जात आहे, या क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात भारतीयांना रिक्वेस्ट पाठवली जात आहे, रिक्वेस्ट पाठवणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक हे +234 या क्रमांकावर सुरू होणारे आहेत आणि मेम्बरची नावे आणि डीपीवरील फोटो भारतीय नागरिकांचा असतो. +234 हा कोड नायजेरियाचा आहे, त्यामुळे या फसवणुकीत नायजेरियन टोळी अजूनही मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

काय दक्षता घ्याल? 

बिटकॉइन (Bitcoin) आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आणि योग्य परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीच्या संधींचा सखोल अभ्यास करा, सुरक्षित पाकीट आणि एक्सचेंजेस वापरा, द्वि-घटक प्रमाणिकरण सक्षम करा आणि ऑफरपासून सावध रहा जे सत्य असायला खूप चांगले वाटतात. तुम्हाला संशयास्पद वाटले किंवा आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याची तक्रार करा आणि तात्काळ मदत घ्या, असे महाराष्ट्र सायबर सेलकडून सांगण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.