- खास प्रतिनिधी
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या आणि काही जागांवर लक्षणीय मते मिळवणारा प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्ष या विधानसभा निवडणुकीत प्रभावहीन ठरत असून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ‘वंचित’ची जागा भरून ‘वंचित’चा बाजार उठवला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (MNS)
४० मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यात ४८ पैकी ४० मतदारसंघात वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. तर चंद्रपूर, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर या मतदारसंघात लाखांच्या वर मते घेतली होती. दोन माजी मुख्यमंत्री, नांदेडचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे त्याचप्रमाणे गडचिरोलीचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी, हातकणंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव हा केवळ वंचितच्या मतांमुळे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. धाराशिवचे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील, परभणीचे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, रायगडचे शिवसेना उमेदवार अनंत गीते या मतदारसंघातही वंचितने चांगला प्रभाव पाडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (MNS)
(हेही वाचा – Sanjay Raut यांनी जळगाव ग्रामीणचे तिकीट विकले; गुलाबराव पाटील यांची टीका)
उपद्रवमूल्य
तर सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वंचितने काही मतदारसंघात आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. अकोला, बीड, बुलढाणा, हातकणंगले आणि मुंबई उत्तर-पश्चिम या पाच मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली मते ही विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यापेक्षा अधिक आहेत. (MNS)
नेते, उमेदवारांची चर्चा नाही
असे असले तरी या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीने निवडणूक रिंगणात उतरवलेल्या १७२ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराची चर्चा होताना दिसत नाही, तसेच उमेदवाराचा प्रभाव दिसेल असा एकही मतदारसंघ राज्यात दिसत नाही. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सभा नाहीत की वंचितच्या नेत्यांचा बोलबाला नाही. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर काही ठिकाणी सभा घेत आहेत पण त्यांच्या भाषणाची चर्चा माध्यमांमध्ये किंवा समाज माध्यमांवरही तुरळकच होताना दिसून येते. (MNS)
वंचितची जागा मनसेने घेतली
याउलट १३४ उमेदवार लढवणाऱ्या मनसेचे उमेदवार अधिक चर्चेत आहेत. माहीममधील उमेदवार अमित राज ठाकरे, शिवडीचे बाळा नांदगावकर, ठाण्याचे अविनाश जाधव, कल्याणचे राजू पाटील, पुण्याचे मयूरेश वांजळे असे अनेक उमेदवार चर्चेत आहेत. राज ठाकरे यांच्याही नियमित जाहीर सभा, न्यूज चॅनेलला मुलाखती सुरू आहेत. त्या तुलनेत वंचितकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीतील वंचितची जागा मनसेने घेतली आणि ‘वंचित’चा बाजार उठवला, असे बोलले जात आहे. (MNS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community