एकनाथ खडसे…महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वपूर्ण असे हे नाव…गेली 40 वर्षे राज्याच्या राजकारणात या नावाने दबदबा निर्माण केला आहे. भाजपमध्ये आपले राजकीय आयुष्य घालवलेले खडसे आता राष्ट्रवादीमध्ये आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांच्या मागे लागलेली साडेसाती काही सुटताना दिसत नाही. आता तर खडसे थेट ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या अडचणी देखील वाढत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र खडसेंच्या अडचणीच्या काळात त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे सध्या तरी चित्र दिसतंय..त्यामुळे खडसेंचा वाल्या कोळी झाला का?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
खडसेंच्या पाठिशी फक्त कुटुंबच
भाजप असताना खडसेंनी महसूल मंत्री, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदे भूषवली..मात्र आता याच खडसेंच्या मागे असलेला जनाधार संकटाच्या काळात मात्र दिसेनासा झाला आहे. खरेतर बहुजनांचा नेता अशी खडसेंची ओळख आहे. मात्र राजकाणात असताना खडसेंनी फक्त स्वत:च्या कुटुंबा व्यतिरिक्त कुणाचा विचार न केल्यानेच खडसेंचे शत्रू वाढत गेले अन् पडत्या काळात खडसेंची साथ कुणी द्यायला तयार नसल्याचे त्यांच्यात मतदार संघातील जाणकार सांगतात. महानंदाचे अध्यक्षही पत्नी मंदाकिनी खडसे यांना केले. मुलगी रोहिणी खडसे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद असो सर्व महत्त्वाची पदे खडसेंनी आपल्या घरात ठेवली आणि याचाच फटका आज खडसेंना बसत असल्याचेही जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यामागे कुणी उभे राहत नसल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा : ईडीच्या कारवाईमागे राजकीय वास येतोय! एकनाथ खडसेंच्या आरोप)
काय आहे खडसेंचा भोसरी भूखंड घोटाळा?
एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांच्या नावाने खरेदी केला होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केला होता, तर त्याची त्यावेळची बाजार भावाची किंमत 40 कोटी इतकी होती, असे सांगितले जात होते. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
Join Our WhatsApp Community