Kolhapur जिल्ह्यातील विधानसभेच्या आखाड्यात कोण बाजी मारणार?

32
Kolhapur जिल्ह्यातील विधानसभेच्या आखाड्यात कोण बाजी मारणार?
Kolhapur जिल्ह्यातील विधानसभेच्या आखाड्यात कोण बाजी मारणार?
  • सुप्रिम मस्कर

    कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात एकूण १२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सर्वत्र बहुरंगी लढत होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर, चंडगडमध्ये १७, राधानगरीत ७, कागलमध्ये ११, कोल्हापूर दक्षिण ११, कोल्हापूर उत्तर ११, शाहूवाडीत १४, हातकणंगलेमध्ये १६, इचलकरंजीमध्ये १३, शिरोळ १०, करवीरमध्ये ११ उमेदवारांमध्ये लढत आहे. सर्वात कमी उमेदवार राधानगरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कुठल्या विधानसभेत कोणत्या पक्षाचा उमेदवार?

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात दहा विधानसभेत महायुतीतील भाजपाने इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण विधानसभेत दोन, शिवसेनेने राधानगरी, करवीर, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले विधानसभेत चार अधिकृत आणि शिरोळमध्ये एक पुरस्कृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने चंडगड, कागल या मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. तसेच महायुतीने शाहूवाडी विधानसभेत जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेनेने(उबाठा) राधानगरी, शाहूवाडी या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. तर शरद पवार गटाने चंदगड, कागल, इचलकरंजी अशा तीन मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसने कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले आणि शिरोळा अशा चार विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील विधानसभेनुसार उमेदवार

चंदगड विधानसभेत नंदिता बाभूळकर( राष्ट्रवादी- श.प) आणि राजेश पाटील (राष्ट्रवादी- अ.प), अशोक पाटील (अपक्ष)अशी लढत आहे. राधानगरी विधानसभेत के.पी. पाटील (शिवसेना- उबाठा) विरुद्ध प्रकाश आबिटकर (शिवसेना) आणि युवराज यडुरे अशी मुख्य लढत आहे. कागल विधानसभा समरजीत घाटगे (राष्ट्रवादी- श.प) विरुद्ध हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी- अ.प) अशी मुख्य लढत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभेत ऋतुराज पाटील (काँग्रेस) विरुद्ध अमल महाडीक (भाजपा) अशी लढत होणार आहे. करवीर विधानसभेत राहुल पाटील (काँग्रेस) विरुद्ध चंद्रदीप नरके (शिवसेना) यांच्यात मुख्य लढत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेत राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध राजेश क्षीरसागर (शिवसेना) अशी लढत आहे. शाहूवाडी विधानसभेत सत्यजित पाटील (शिवसेना- उबाठा) विरुद्ध विनय कोरे (जनसुराज्य) अशी लढत आहे. हातकणंगले विधानसभेत राजू आवळे (काँग्रेस) विरुद्ध अशोकराव माने (शिवसेना) अशी लढत होणार आहे. इचलकरंजी विधानसभेत मदन कांरडे (राष्ट्रवादी- श.प) विरुद्ध राहुल अवाडे (भाजपा) अशी लढत आहे. तर शिरोळ विधानसभेत गणपतराव पाटील (काँग्रेस) विरुद्ध राजेश येड्रावकर (शिवेसना पुरस्कृत) अशी लढत होणार आहे.

चंदगड विधानसभेत तिहेरी लढत

चंदगड विधानसभेत (Chandgad Assembly) नंदिता बाभूळकर( राष्ट्रवादी- श.प) आणि राजेश पाटील (राष्ट्रवादी- अ.प), अशोक पाटील (अपक्ष) अशी लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बंडानंतर दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. राजेश पाटील विद्यमान आमदार असल्याने त्यांच्या समोर मुख्य आव्हान नंदिता बाभूळकर यांचे आव्हान आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला मानला जातो. २०१९ ला राजेश पाटील यांच्यासमोर अपक्ष उमेदवार अशोक पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी ४,३३८ मतांनी राजेश पाटलांचा विजय झाला होता. त्यात अशोक पाटील यावेळी ही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात मतविभागणी झाल्यास अशोक पाटील यांना फायदा होऊ शकतो. मात्र राजेश पाटील विजयासाठी रणनिती आखताना दिसत आहेत.

कागलमध्ये घाटगे विरुद्ध मुश्रीफ

कागल विधानसभा (Kagal Assembly) समरजीत घाटगे (राष्ट्रवादी- श.प) विरुद्ध हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी- अ.प) अशी मुख्य लढत आहे. हसन मुश्रीफ विद्यमान आमदार असून गेली ३ टर्म ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे अपक्ष म्हणून २०१९ ला याचं मतदारसंघात निवडणुक लढवणाऱ्या समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा सच्चा मतदार कुणाच्या पाठिंशी उभा राहतो, यावर निकालाचे चित्र स्पष्ट होईल. (Kagal Assembly)

राधानगरीत घटकपक्षांची साथ महत्त्वाची

राधानगरी विधानसभेत (Radhanagari Assembly constituency) के.पी. पाटील (शिवसेना- उबाठा) विरुद्ध प्रकाश आबिटकर (शिवसेना) यांच्यातच मुख्य लढत आहे. प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत. मात्र २०१९ ला प्रकाश आबिटकर शिवसेनेच्या आणि के.पी. पाटील राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात यावेळी के.पी.पाटील शिवसेना(उबाठा) तर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पाटील यांना उबाठा आणि राष्ट्रवादी (श.प), काँग्रेस अशा तिन्ही समर्थकांची मते मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र अजित पवार गटाची मते आणि शिवसैनिकांची मते आबिटकरांना मिळाली तर के.पी. पाटील यांना पुन्हा आबिटकरांचे आव्हान असेल.(Radhanagari Assembly constituency)

करवीरमध्ये भावनिकता विरुद्ध कडवी झुंज

करवीर विधानसभेत (Karvir Assembly Elections) राहुल पाटील (काँग्रेस) विरुद्ध चंद्रदीप नरके (शिवसेना) यांच्यात मुख्य लढत आहे. २०१९ ला या मतदारसंघात काँग्रेसच्या पी.एन पाटील विरुद्ध शिवसेनेकडून चंद्रदीप नरके अशी लढत झाली होती. त्यावेळी पी.एन. पाटील २२, ६६१ मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. मात्र मे २०२४ ला त्यांचे निधन झाले. त्यामुळे पी.एन. पाटील यांचे सुपूत्र राहुल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. मात्र चंद्रदीप नरके २०१४ ला याचं मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे राहुल पाटील यांना चंद्रदीप नरके यांचे मोठे आव्हान असणार आहे. परंतु सहानभुतीच्या जोरावर त्यांना लोकांनी मतदान केले तर चंद्रदीप नरके बॅकफुटला जाऊ शकतात. मात्र पी. एन. पाटलांच्या मतदारसंघातील प्रतिमेवर हे अवलंबून आहे.(Karvir Assembly Elections)

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार बाजी मारणार का?

कोल्हापूर उत्तर विधानसभेत (Kolhapur North Assembly) राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध राजेश क्षीरसागर (शिवसेना) अशी लढत आहे. या मतदारसंघात २०१९ ला चंद्रकांत जाधव विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी लढत होऊन चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र २१ नोव्हेंबर २०२१ ला त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव आणि सत्यजीत कदम अशी लढत झाली. त्यावेळी भावनिक होऊन लोकांनी जयश्री जाधवांना विजयी केले. यावेळी पुन्हा क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र मधुरिमाराजे छत्रपती यांनी ही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र खासदार शाहू महाराज यांनी केलेल्या मध्यास्थीनंतर मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेतली. तसेच मधुरिमाराजे राजेश लाटकर यांच्या प्रचारात उतरल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर याचं पारडं जड झालं आहे. परंतु क्षीरसागर यांच्या २०१९ पासून इथल्या मतदारांशी जनसंपर्क आहे. (Kolhapur North Assembly)

पुन्हा शाहूवाडीत पाटील विरुद्ध कोरे आमनेसामने

शाहूवाडी विधानसभेत (Shahuwadi Assembly constituency) सत्यजित पाटील (शिवसेना- उबाठा) विरुद्ध विनय कोरे (जनसुराज्य) अशी लढत आहे. या मतदारसंघात २००९ ते २०१९ या कालावधीत मुख्य लढत याचं दोन उमेदवारांमध्ये झाली आहे. २००९ ला विनय कोरे, २०१४ ला मोदी लाटेत शिवसेनेकडून सत्यजित पाटील, २०१९ ला जनसुराज्य पक्षाकडून पुन्हा विनय कोरे विजयी झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत महायुतीने विजय कोरे यांना आणि सत्यजित पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर आणि महायुतीच्या पाठिंब्याने विनय कोरे निवडून येतील अशी शक्यता आहे. मात्र त्यांच्यासमोर सत्यजित पाटील यांचे आव्हान आहे, हे नक्की.(Shahuwadi Assembly constituency)

हातकणंगलेत तिहेरी लढत

हातकणंगले विधानसभेत राजू आवळे (काँग्रेस) विरुद्ध अशोकराव माने (शिवसेना), सुजित मिणचेकर (अपक्ष) यांच्यात मुख्य लढत होणार आहे. विद्यमान आमदार राजू आवळे यांची २०१९ ला मिणचेकर आणि अशोकराव माने यांच्याशी लढत झाली होती. त्यावेळी जनसुराज्य शक्तीतर्फे अशोकराव माने आणि सुजित मिणचेकर शिवसेनेकडून निवडणुक रिंगणात होते. मात्र २०२४ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या अशोकराव माने यांना शिवसेनेसह महायुतीने पाठिंबा दिला आहे. तर सुजित मिणचेकर ही निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे तिहेरी लढतीत आवळे कर गड राखतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इचलकरंजीत मित्रपक्षांची मते महत्त्वाची

इचलकरंजी विधानसभेत मदन कांरडे (राष्ट्रवादी- श.प) विरुद्ध राहुल अवाडे (भाजपा) अशी लढत आहे. या मतदारसंघात २००९ आणि २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टी (भा.ज.प.) चे सुरेश हलवणकर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला, ज्यामुळे इचलकरंजीत भाजपचा प्रभाव वाढला. मात्र २०१९ मध्ये काँग्रेसचे प्रकाशन्ना आवडे यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजय प्राप्त केला. यावेळी २०२४ ला प्रकाश अवाडे यांचे पूत्र राहुल अवाडे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे वडीलांच्या प्रसिद्धीचा फायदा राहुल यांना होऊ शकतो. या मतदारसंघात २०१४ ला मदन कांरडे राष्ट्रवादीकडून निवडणुक रिंगणात होते. मात्र त्यावेळी त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी काँग्रेसचा मतदार इथे मोठ्या प्रमाणात आहे. अशात मदन कांरडे यांना दुहेरी फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आणि काँग्रेसची मते कांरडे की अवाडे यांना मिळतात, यावर निकाल निश्चित आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभेत दुहेरी लढत

कोल्हापूर दक्षिण विधानसभेत ऋतुराज पाटील (काँग्रेस) विरुद्ध अमल महाडीक (भाजपा) अशी लढत होणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभेत २०१९ ला ऋतुराज पाटील काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. याआधी २०१४ ला अमल महाडीक भाजपाच्या मतावर निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघात ऋतुराज पाटील (काँग्रेस) विरुद्ध अमल महाडीक (भाजपा) अशीच मुख्य लढत आहे.

शिरोळमध्ये मतदारांचा निवडणार युती की आघाडी

शिरोळ विधानसभेत गणपतराव पाटील (काँग्रेस) विरुद्ध राजेश यड्रावकर (शिवेसना पुरस्कृत), उल्हास पाटील (स्वाभिमानी पक्ष) अशी लढत होणार आहे. राजेश यड्रावकर विद्यमान आमदार असून त्यांना महायुतीने यावेळी पाठिंबा जाहीर केला आहे. २००९ नंतर या मतदारसंघातील मतदार युतीच्या बाजूने मतदान करताना दिसला. मात्र युती- आघाडीच्या गोतावळ्यात यावेळी मतदार कुणाच्या पाठिंशी उभे राहतात, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.