मुंबईतील उद्यान, मैदानांची विकासकामे आता प्राधान्य क्रमानुसारच!

मुंबईत २९१ उद्याने, मैदाने, ४७५ मनोरंजन मैदाने, ३५५ क्रीडांगणे असून त्यांची दैनंदिन देखभाल मुंबई महापालिकेच्यावतीने केली जात आहे.

141

कोरोना काळात मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे आदींचा विकास खुंटला असून या सर्व मोकळ्या जागांची देखभाल व दुरुस्तीवरच महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक बकाल झालेल्या उद्यान, मैदानांच्या नुतनीकरणाची कामे तातडीने हाती घेणे आवश्यक असले तरी सध्या महापालिकेने यासाठी अपुऱ्या निधीची तरतूद केल्यामुळे या विकासकामांना खिळ बसली आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीचा योग्यप्रकारे विनियोग व्हावा, यासाठी बकाल झालेल्या मोकळ्या जागा तसेच ताब्यात आलेले आरक्षित भूखंडांचा विकास करून सुशोभित करण्याची कामे आता प्राधान्यक्रम ठरवून हाती घेतली जाणार आहे. यासाठी अशा प्रकारच्या सर्व मोकळ्या जागांचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार असून त्यानुसारच तातडीने विकास करण्याची कामांची यादी प्राधान्यक्रम एकमध्ये नमुद करून ही कामे केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनामुळे उद्याने, मैदानांकडे महापालिकेचे दुर्लक्ष  

मुंबईत २९१ उद्याने, मैदाने, ४७५ मनोरंजन मैदाने, ३५५ क्रीडांगणे असून त्यांची दैनंदिन देखभाल मुंबई महापालिकेच्यावतीने केली जात आहे. महापालिकेच्यावतीने अशाप्रकारे करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना विविध संस्थांच्या ताब्यात असलेल्या २१६ मोकळ्या जागांपैकी सुमारे २०० जागांचा ताबा महापालिकेने आपल्याकडे घेतला आहे. संस्थांच्या ताब्यातून घेतलेल्या या मोकळ्या जागांची देखभाल, दुरुस्ती ही महापालिकेच्यावतीने करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी यासाठी गटनेत्यांच्या मान्यतेने ११ महिन्यांचे एक धोरण बनवून पुन्हा या मोकळ्या जागां संस्थांना सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु याला फारसा प्रतिसाद मिळत नसून कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून या उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

(हेही वाचा : निष्ठेचे दाखले देत शिवसेना, मनसेकडून भाजप कार्यकर्त्यांना चिथवण्याचा प्रयत्न!)

चालू अर्थसंकल्पात भरीव तरतूद नाही!   

मुंबईतील अनेक उद्याने, मैदाने तसेच मनोरंजन मैदानांची स्थिती बकाल असून कोविडमुळे या मोकळ्या जागा बंद असल्याने नागरिकांकडून फारशा तक्रारी होत नसल्या तरी पुन्हा एकदा या जागा खुल्या झाल्याने येथील असुविधांचा फटका येथे फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. मागील अर्थसंकल्पात या मोकळ्या जागांच्या विकासासाठी तरतूद केलेला निधी कोविडसाठी खर्च करण्यात आला. त्यामुळे नुतनीकरणाची कामे न करता दैनंदिन देखभाल दुरुस्तीकडेच उद्यान विभागाने भर दिला. त्यानंतर चालू अर्थसंकल्पातही उद्यानांचे सुशोभिकरण व नुतनीकरणाच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मोकळ्या जागांच्या देखभाल व दुरुस्तीवरच अधिक भर दिला जाणार आहे. मात्र, उद्याने, मैदाने, क्रीडांगणे तसेच मनोरंजन मैदानांचे आरक्षित भूखंड महापालिकेच्या ताब्यात आलेले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. शिवाय अनेक उद्याने व मैदानांची अवस्था बकाल झाली आहे. त्यांचेही नुतनीकरण करणे आवश्यक असून याच दृष्टीकोनातून त्यांचे नुतनीकरण करून विकास करण्यासाठी यापूर्वी केलेल्या रस्ते कामांच्या धर्तीवर प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी उद्याने व मैदानांच्या विकासकामांसाठी बृहतआराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याने खराब रस्त्यांची यादी तयार करून रस्ते विकासकामांचा बृहतआराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये तीन प्राधान्यक्रम ठरवून त्या त्याप्रमाणे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली होती. त्याचधर्तीवर उद्याने व मैदानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाकडून प्राप्त होत आहे.

उद्यान, मैदानांच्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरला!

यासंदर्भात उद्यान विभागाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या उदयाने, मैदाने तसेच मोकळ्या जागांच्या देखभाल व दुरुस्तीवर भर दिला जात आहे. परंतु अनेक उद्याने, मैदाने ही सुस्थितीत नाहीत, तसेच अनेक ठिकाणी मुलांची खेळणी व इतर साहित्यही नाहीत. काही आरक्षित भूखंडही आपल्या ताब्यात आहेत, ज्यांचे नुतनीकरण आवश्यक आहे. ती सर्व विकासकामे प्राधान्य क्रम ठरवून हाती घेतले जाईल. ज्यामध्ये सुरक्षा भिंत घालणे किंवा पूर्णपणे नुतनीकरण करणे आदींचा समावेश असेल. जेणेकरून ज्या उद्यान, मैदानांचा विकास तातडीने होणे आवश्यक आहे, त्यांचा विकास हा तरतूद असलेल्या निधीतून करता येईल आणि ज्या उद्यान व मैदानांच्या विकासाची कामे अत्यंत तातडीने करणे आवश्यक नाही, ती कामे प्राधान्य क्रमांक दोनमध्ये हाती घेतली जातील. यामुळे टप्प्याटप्प्याने मैदाने, उद्यानांचा विकास चांगल्याप्रकारे होईल आणि जनतेला कोणत्याही गैरसोयी असुविधांचा त्रास सहन करावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.