- ऋजुता लुकतुके
अलीकडेच मुंबई रणजी संघाला विजेतेपद मिळवून देणारा ओमकार साळवी आता आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. ओमकारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने यंदा इराणी चषकही पटकावला आहे. ओमकार हा मुंबईचा प्रथितयश तेज गोलंदाज अविष्कार साळवीचा लहान भाऊ आहे. मितभाषी पण कामाला चोख अशी ओमकार साळवीची मुंबई क्रिकेटमध्ये ओळख आहे. (RCB Bowling Coach)
आयपीएलमध्ये ओमकार दुसऱ्यांदा काम करणार आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक होता. तर अगदी अलीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबरही त्याने काम केलं आहे. ओमकारचा भाऊ अविष्कारही सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. तर पंजाब रणजी संघाचा तो मुख्य प्रशिक्षक आहे. (RCB Bowling Coach)
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy 2024 : बोर्डर – गावसकर चषकातून भारताला मिळालेले क्रिकेटमधील हिरे)
पुढील वर्षी विराट कोहली बंगळुरू संघाचं नेतृत्व पुन्हा एकदा करणार आहे. ओमकार साळवी सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनशी करारबद्ध आहे. मार्च २०२५ मध्ये या जबाबदारीतून मोकळा झाल्यावर तो बंगळुरू फ्रँचाईजीच्या संघाबरोबर काम सुरू करेल. त्यापूर्वी आगामी मेगा लिलावातही तो बंगळुरू फ्रँचाईजीबरोबर असेल. आयपीएलचा २०२५ चा हंगाम मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होईल असा अंदाज आहे. (RCB Bowling Coach)
ओमकार साळवीच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई संघाने ८ वर्षांनंतर रणजी करंडक जिंकला. तेव्हा ओमकारचं कौतुक करताना मुंबईचा कर्णधार अजिंक्य राहणे म्हणाला होता की, ‘ओमकार सारख्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिंकलो याचा मला जास्त आनंद झालाय. कारण, एकतर तो प्रेरणादायी प्रशिक्षक आहे आणि दुसरं म्हणजे प्रशिक्षक मितभाषी असूनही चांगलं काम करू शकतो, संघाला बांधून ठेवू शकतो, हे ओमकारमुळे सिद्ध झालं.’ साळवी रेल्वेसाठी एकच प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. पण, प्रशिक्षक म्हणून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये लोकप्रिय आहे. आताही मुंबईने त्याच्या मार्गदर्शनाखाली हंगामातील तिसरा विजय मिळवला आहे. प्लेट गटात मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. (RCB Bowling Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community