- सचिन धानजी
ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, शहर आणि राज्याच्या नगर नियोजनाची दूरदृष्टी आहे, नव्हेतर हाती सत्ता नसताना सरकारकडून काम करून घेण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी होते असे व्यक्तीमत्व म्हणजे राज श्रीकांत ठाकरे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) जर आपल्याला यश नाही मिळाले तर मी दुकान बंद करून टाकेन असा त्रागा जरी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात मनसेला बऱ्याच मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याने त्यांच्यावर मनसेचे दुकान बंद करण्याची वेळ येणार नाही, असे वाटते.
पक्षाची स्थापना केल्यानंतर २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले, तर २०१२च्या महापालिका निवडणुकीत २८ नगरसेवक मुंबईत निवडून आले होते. त्यानंतर २०१४च्या आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी एक आमदार निवडून आला. २०१७च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत केवळ ०७ नगरसेवक निवडून आले होते, तेही दुसऱ्या वर्षांत शिवसेनेत गेल्यानंतर केवळ एकमेव नगरसेवक पक्षाकडे शिल्लक राहिला होता. एवढेच काय तर नाशिक, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे यश महापालिका निवडणुकीत मिळाले होते, तेही राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टिकवता आले नाही, याला कारण म्हणजे मतदारांना गृहीत धरणे. २००९च्या किंवा २०१२च्या महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक पर्याय उपलब्ध झाल्याने मराठी मतदारांनी त्यांना मतदान केले होते. परंतु २०१४नंतर एकही लोकसभा निवडणूक न लढवणे हेच मुळी मनसेच्या अपयशाचे कारण आहे. मनसेच्या स्थापनेच्या वेळी अनेक मोठे नेते त्यांच्यासोबत गेले होते, परंतु ते सर्व राज ठाकरेंना सोडून गेले, त्यांना आपल्यासोबत कायम ठेवण्यात अपयश आले. उलट सोडून गेलेले नेते दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार बनले. त्यामुळे प्रभावी वक्तृत्व असले तरी प्रभावी नेतृत्व त्यांना करता आलेले नाही, असे दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election Result)
लोकसभेत आपला उमेदवार निवडून येतो यापेक्षा आपल्या हक्काचे मतदार बांधून ठेवण्यासाठी किंवा ते दुसरीकडे कुठे जाऊ नये हे आवश्यक असते. परंतु मागील दोन्ही निवडणुकीत मनसेने लोकसभा निवडणूक न लढवल्याने त्यांचा मतदार जो इतर पक्षाकडे गेला तो परत आलाच नाही. त्यातच मनसेने ज्या शाखांची बांधणी केली होती, त्यांची पकडही ढिली झाली आणि शिवसेनेप्रमाणे निर्माण केलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे जाळेच तुटले गेल्याने पक्षाला स्थानिक पातळीवर मतदारांना टिकवून ठेवणे किंवा प्रत्येक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या मतदारांचा टक्का वाढवणे यात अपयश येऊ लागले. (Maharashtra Assembly Election Result)
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असली तरी त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नाही, हेच दिसून आले आणि त्याला कारण म्हणजे पक्षाची बसवलेली घडी विस्कळीत झाली. बाळासाहेबांप्रमाणे परखड आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राज्यातील एकाही पक्षाच्या नेत्याला शहराची किंबहुना राज्याच्या विकास आराखड्याची ब्ल्यू प्रिंट मांडता आलेली नाही, परंतु राज ठाकरे हे नगर नियोजनासाठी आग्रही असून त्यांच्या प्रचारसभेतही आपल्याला राजकीय टिकेसोबतच विकासाचे मुद्दे ऐकायला मिळतात. (Maharashtra Assembly Election Result)
(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)
स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्दयावरून आता राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्दयाकडे वळले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा विषय हाताळला आणि त्याला काही अंशी यशही मिळाले. राज्यातील टोलनाके बंद करण्याची मागणी लावून धरत आंदोलन करणाऱ्या राज ठाकरेंच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि आता हलक्या वाहनांसाठी टोल बंद करण्याची घोषणा सरकारने केली. असे एक ना अनेक मुद्दे राज ठाकरे यांनी हाती घेऊन ते लिलया सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. हाती सत्ता नसताना राज ठाकरे यांच्याकडे ही ताकद असली तरी कार्यकर्त्यांची ताकद कमी होत आहे. त्यामुळे ही ताकद जेव्हा वाढेल तेव्हा राज ठाकरे हे या राज्याचे नेतृत्व करण्यास सक्षम असतील. माझ्या हाती एकहाती सत्ता द्या, मी मशिदींवरील भोंगे उतरवून दाखवतो, मोहल्ल्यांमधील गुन्हेगारी साफ करून दाखवतो, असे राज ठाकरे सांगत आहेत आणि ते करून दाखवण्याची धमक राज ठाकरे यांच्यामध्येच आहे. पण एकहाती सत्ता घेण्यासाठी शिवसैनिकांप्रमाणे मनसैनिक हा विभागात सक्रीय व्हायला हवा. असे म्हटले जाते की भाषण रेशन देत नाही. त्यामुळे राज ठाकरे हे सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत असतील, पण लोकांना त्यांच्यावर किती विश्वास आहे, हे पाहणेही महत्वाचे आहे. (Maharashtra Assembly Election Result)
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले की, भाजपाचे सरकार येणार आणि आमच्या मदतीने ते सरकार आलेले असेल. याचाच अर्थ राज ठाकरे यांना विजयाबद्दल विश्वास आहे. राज ठाकरे यांना मागील दोन निवडणुकांमधील (Maharashtra Assembly Election Result) निकाल बदलून दोन आकडी संख्या पार करायची आहे. सध्याचे वातावरण पाहता ही दोन आकडी संख्या पार करणे शक्य वाटत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मागील दोन निवडणुकींपेक्षा वेगळा निकाल येऊन मोठे यश संपादित करता येईल हे सध्याच्या वातावरणावरून स्पष्ट होत असल्याने राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली खंत तथा नाराजीप्रमाणे त्यांना त्यांचे दुकान बंद करण्याची वेळ येणार नाही, हे तर निश्चित!
Join Our WhatsApp Community