मुंबई महापालिकेच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची रक्कम न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्ती्ची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने मालमत्ता कर चुकवणाऱ्या थकबाकीदार कंपनीची दुसरी यादी जाहीर केली असून यात एच. डी. आय. एल. लिमिटेड,कमला मिल्स् लिमिटेड,वाधवा डिझर्व्हह बिल्डर,गॅलेक्सी कॉर्पोरेशन,ओंकार डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड आदी दहा बड्या मालमत्ता थकबाकीदारांची दुसरी यादी प्रकाशित करून त्यांना नोटीस बजावली आहे. या दहा बड्या थकबाकीदार कंपनीकडे तब्बल २२२ कोटींची रक्कम बाकी आहे. (BMC)
विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तुतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम २०६ अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. (BMC)
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते. (BMC)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर व उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची कर भरणा करण्याकरीता होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईल सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कर भरणा ऑनलाईन करण्याकरीता करदात्यांनी महानगरपालिका संकेतस्थतळावरील माहितीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. (BMC)
(हेही वाचा- Live : Maharashtra Assembly Election Result 2024 : मतमोजणीला सुरुवात; पोस्टल मतांचा कल लवकरच येणार हाती)
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ थकबाकीदार मालमत्ताधारकांची यादी-
१) एच. डी. आय. एल. लिमिटेड (एच पूर्व विभाग) – ३१ कोटी ६८ लाख ५१ हजार ३९८ रुपये
२) कमला मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – ३० कोटी ८२ लाख ६२ हजार १६६ रूपये
३) मेसर्स वाधवा डिझर्व्हह बिल्डर (एम पूर्व विभाग) – २६ कोटी २४ लाख २९ हजार ६६५ रूपये
४) कमला मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – २३ कोटी ६४ लाख १९ हजार ८३४ रुपये
५) गोविंदराम ब्रदर्स लिमिटेड (के पश्चिम विभाग) – २२ कोटी ३० लाख ६७ हजार ०५० रुपये
६) हीज होलीनेस सरदार ताहीर सैफुद्दिन साहिब (डी विभाग) – १९ कोटी ९० लाख २४४ रुपये
७) गॅलेक्सी कॉर्पोरेशन (एच पश्चिम विभाग) – १८ कोटी ६६ लाख ८१ हजार ४९४ रुपये
८) सुरज हांडा, विष्णू प्रसाद (के पश्चिम विभाग) – १८ कोटी १२ लाख १८ हजार ९१३ रुपये
९) अरिस्टों डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एम पूर्व विभाग) – १६ कोटी ०५ लाख ९३ हजार ४१९ रुपये
१०) ओंकार डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – १४ कोटी ८७ लाख ५९ हजार ५८२ रूपये
हेही पहा-
Join Our WhatsApp Community