Sharad Pawar यांच्या प्रतिमेला धक्का देणारी निवडणूक

शरद पवार यांना राज्यातील वातावरण ओळखण्यात अपयश आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

79
विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ज्या प्रकारे प्रचार केला आणि प्रचाराचे मुद्दे उपस्थित केले, त्यामागील प्रमुख सूत्रधार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार होते, मात्र निवडणुकीचे हे निकाल शरद पवारांच्या (Sharad Pawar) प्रतिमेला धक्का बसवणारा आहे.

शरद पवारांनी ६९ सभा घेतलेल्या 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी अक्षरश: भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुती आणि विशेषत: भाजपाच्याविरोधात केलेला प्रचार हा चर्चेचा विषय ठरला होता. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरात ६९ सभा घेतल्या होत्या. त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील सभांना मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांची भाषणेही प्रचंड गाजली होती. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुतारीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून येतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, हा अंदाज सपशेल फोल ठरला.

शरद पवारांचा करिष्मा फेल 

गेल्या पाच वर्षांमध्ये शरद पवार हे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या करिष्म्यामुळे मविआला विजय मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे अनेक बडे नेते गळाला लावले होते. त्यांनी जातीय आणि राजकीय समीकरणांचा विचार करुन अनेक ठिकाणी उमेदवार हेरले होते. विधानसभेच्या प्रचारात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा अजेंडा खोडून काढला होता. याशिवाय, लाडक्या बहीणमुळे महायुतीला मिळणारी सहानुभूतीही शरद पवार यांनी महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत कमी करण्याचा प्रयत्न करत होता. शरद पवार यांच्या सभांमधील सोयबीन आणि कपाशीला मिळणारा कमी भावाचा मुद्दाही प्रभावी ठरेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल पाहता शरद पवार यांची रणनीती आणि करिष्मा पूर्णपणे फेल गेल्याचे दिसत आहे.

राज्याचे वातावरण ओळखण्यात पवार अपयशी 

आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांचे एक अढळ स्थान होते. शरद पवार  कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात किंवा ते राजकीय वाऱ्याची दिशा बदलू शकतात, अशाप्रकारची सामर्थ्यशाली प्रतिमा जनमानसात होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला मोठा शह ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी भाजपा आणि महायुतीचे मनसुबे उधळून लावतील, असे दावे केले जात होते. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाला अवघ्या १५ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. हा शरद पवार (Sharad Pawar) गटासाठी मोठा धक्का ठरला. त्यामुळे शरद पवार यांना राज्यातील वातावरण ओळखण्यात अपयश आल्याची चर्चा सुरु झाली आहे. याउलट भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्राऊंड लेव्हलला अचूक व्यवस्थापन करुन हारलेली लढाई पुन्हा खेचून आणली, असे बोलले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.