Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच!

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना त्यांचे नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान होते, विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी ते आव्हान स्वीकारले.

74
– नित्यानंद भिसे 
राज्यातील या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांनी आपण आता निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेत आहे. तसेच राज्यसभाही पुन्हा लढवणार नाही, असे जाहीरपणे सांगितले. म्हणजेच शरद पवार पुढील २ वर्षांत सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार, हे निश्चित आहे. अशा वेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार हे करतील अशी रणनीती शरद पवारांनी आखली, पण विधानसभा निवडणुकीतील अजित पवार यांच्या घवघवीत यशामुळे शरद पवारांचीही रणनीती अपयशी ठरली आहे. आता अजित पवार (Ajit Pawar) हेच शरद पवारांनंतर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वमान्य नेतृत्व असतील, हे आताच स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह  

विधानसभा निवडणूक २०१९च्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेमध्ये ट्विस्ट आला होता. कारण युती म्हणून निवडणूक लढवलेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट दोन्ही काँग्रेसशी सलगी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र दोन वर्षांतच एकनाथ शिंदे यांनी हे सरकार नियमबाह्यपणे स्थापन झाले असल्याचे सांगत त्यांनी ४० आमदार फोडून भाजपाला पाठिंबा देऊन महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर पुढच्या एक वर्षांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी २ जुलै २०२३ रोजी पक्षातील ४० आमदार फोडून भाजपा-शिवसेना सरकारमध्ये गेले. राज्याच्या राजकारणातील या सारीपटात बदलेले हे चित्र घेऊन सगळे पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. एका बाजूला शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस अशी महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी महायुती असे सहा पक्ष लोकसभेला सामोरे गेले. पण यात महायुतीला जोरदार फटका बसला. त्यात अजित पवारांना (Ajit Pawar) मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांनी ४ जागा लढवल्या, त्यातील फक्त १ जागा त्यांनी जिंकली. त्यामुळे अजित पवार यांना निवडणूक आयोगाने पक्षाची सर्व सूत्रे हाती दिली, पक्ष, चिन्ह दिले, पण अजित पवार (Ajit Pawar) यांचे नेतृत्व पक्षाने, कार्यकर्त्याने स्वीकारले नाही, असा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून देण्यात आला होता. कारण खुद्द बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात स्वतःची पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले होते. त्या बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. कारण याच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे ८ खासदार निवडून आले होते. त्यामुळे जनता आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनाच स्वीकारले आहे, असा संदेश गेला होता.

विधानसभा निवडणुकीत करून दाखवले 

म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांना त्यांचे नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान होते आणि विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये अजित पवारांनी ही आव्हान स्वीकारले. या निवडणुकीत अजित पवार यांनी ५५ जागा लढवल्या, त्यातील ४१ जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी ८६ जागा लढल्या आणि त्यातील केवळ १० जागा जिंकल्या. तसेच बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली, या निवडणुकीत अजित पवार १ लाख ८९९ मताधिक्याने विजयी झाले. अशा प्रकारे राष्ट्रवादीचे आता भविष्यातील खरे वारसदार अजित पवारच असतील, असा संदेश या निवडणुकीने दिला. आणि ज्या बारामतीकरांनी लोकसभेत अजित पवारांना नाकारले, त्या बारामतीकरांनी अजित पवारांना विधानसभेत स्वीकारले. यावरून अजित पवारच (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे वासरदार आहेत, हे स्पष्ट करणारी ही निवडून ठरली.

आता अजित पवारांचा उठाव यशस्वी झाला 

अजित पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. म्हणूनच शरद पवार (Ajit Pawar) यांनी जेव्हा २ मे २०२३ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत पक्षातील पहिल्या फळीतील बरेचसे नेते आणि उपस्थित कार्यकर्ते शरद पवारांना राजीनामा मागे घेण्यास सांगत होते, तेव्हा अजित पवार यांना मात्र शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी असेच वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसा आपल्याकडेच असावा, असा अजित पवारांचा आग्रह होता. परंतु शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आणि तेव्हापासून अजित पवारांचा उठाव सुरू झाला. अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षाचा सूत्रधार होण्याची महत्वाकांक्षा पूर्णही केली. पण ते सिद्ध करण्यासाठी अजित पवार यांच्यासमोर निवडणुकीत यश मिळवणे आव्हान होते. जे अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये यशस्वीरीत्या स्वीकारले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.