- ऋजुता लुकतुके
क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. आणि तिथल्या उमरावांमध्ये हा खेळ खेळला जात होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. उमरावांकडे असलेल्या मोठ्या इस्टेटीत जमिनीचा एक छोटा तुकडा हमखास क्रिकेटच्या खेळासाठी राखून ठेवलेला असायचा. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा खेळ राजेशाहीच मानला गेला आहे. आधी इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियात हा खेळ सुरुवातीला पसरला. आणि पुढे इंग्लंडने जगभरात राज्य केलेल्या राष्ट्रकूल देशांमध्ये हा खेळ पसरला आणि त्याला जागतिक स्वरुप आलं.
इंग्लंडमध्येही राजे आणि उमरावांच्या बाहेर हा खेळ नेण्याचं आणि लोकांमध्ये तो लोकप्रिय करण्याचं श्रेय इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू सर विल्यम गिलबर्ट ग्रेस (W. G. Grace) यांच्याकडे जातं. म्हणूनच ग्रेस यांना जागतिक क्रिकेटचा पितामह मानलं जातं. १८४८ साली जन्म झालेले ग्रेस तीन दशकं क्रिकेट खेळले. आणि यात त्यांनी तब्बल ५८,००० धावा आणि २,००० च्या वर बळी मिळवले. ‘क्रिकेट त्यांनी आपल्या खांद्यावर पेललं,’ असं त्यावेळी इंग्लंडमध्ये म्हटलं जायचं.
(हेही वाचा – Larsen and toubro share price : एल अँड टी कंपनीचा शेअर अलीकडे एवढा का वाढला?)
डब्ल्यू जी ग्रेस यांनी क्रिकेट इंग्लंड आणि बाहेरही नेलं. पुढे ऑस्ट्रेलियन डॉन ब्रॅडमन यांनी लोकप्रियता आणखी वाढवली. पण, त्याचवेळी भारतात क्रिकेट रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजा रणजित सिंग यांनी केलं. पण, तेव्हा भारताचा वेगळा संघ नव्हता. आणि देश पारतंत्र्यात होता. पण, रणजित सिंग यांनी ब्रिटिश संघांबरोबर खेळताना प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ५०,००० च्या वर धावा केल्या आहेत. त्यांच्याबरोबरच दुलिप सिंग आणि देबू देवधर या दिग्गजांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतात दैदिप्यमान कामगिरी केली.
पण, भारताचे क्रिकेटमधील पितामह (Godfather of Cricket) हा मान जातो तो लिटलमास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनाच. जगभरात क्रिकेटमध्ये भारताचं नाव सगळ्यात आधी मोठं करणाऱ्यांमध्ये गावसकर हे नाव आघाडीने घ्यावं लागेल. त्यांच्यामुळे खेळही देशात लोकप्रिय झाला. अशाच एका दौऱ्याच्या वेळी वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स (Viv Richards) यांनी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा उल्लेख ‘भारताचा छोटा क्रिकेट पितामह,’ असा केला. आणि तिथून हेच नाव त्यांच्यासाठी रुढ झालं.
(हेही वाचा – शिवसेना कार्यकारिणी बैठकीत मुख्य नेते Eknath Shinde यांना सर्वाधिकार)
आधुनिक क्रिकेटमध्ये मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द लाभली ती सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना. ते १२५ कसोटी खेळले. आणि यात ६४ धावांच्या सरासरीने त्यांनी १०,१२२ धावा केल्या. तेव्हा कसोटीत १०,००० चा टप्पा गाठणारे ते पहिले क्रिकेटपटू होते. म्हणूनच आधुनिक क्रिकेटमध्ये त्यांनाच भारतीय क्रिकेटचं पितामह मानण्यात येतं. सर्वाधिक ३४ कसोटी शतकांचा विक्रमही सुनील गावसकर यांनी त्यांच्याकाळात केला होता.
पुढे सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेटचा देव असं बिरुद मिळालं. तर विराट कोहलीने आपल्या कामगिरीने क्रिकेटचा राजा असं बिरुद मिळवलं. महेंद्र सिंग धोनीने संघाला महत्त्वाचे विजय मिळवून दिले. एकदिवसीय, टी-२० आणि कसोटीतही भारताला अव्वल स्थान मिळवून दिलं. त्यामुळे धोणीला भारतीय संघातील पितामह म्हटलं जातं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community