- नित्यानंद भिसे
विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक आणि आश्चर्यजनक निकालावरून मविआतील सर्व घटक पक्षांना २०१४ सालच्या निवडणुकीची आठवण नक्कीच झाली असेल. त्या निवडणुकीच्या निकालानंतर ‘सुपडा साफ’ हा शब्द पुन्हा २०२४ ला ऐकिवात येऊ शकतो अशी कुणालाच सुतराम शक्यता नव्हती, पण हे वास्तव घडले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १०३ जागा लढल्या, पण काँग्रेस (Congress) अवघ्या १६ जागा जिंकू शकली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी हाक दिली होती. खरेतर निवडणुकीच्या निकालानंतर कोणताही पक्ष पूर्णपणे संपत नसतो, पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसने अवघ्या ५२ जागा जिंकल्या, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या. पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या.
काँग्रेस पुन्हा २०१४च्या अवस्थेत
२०१४च्या निवडणुकीनंतर २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रसातळाला गेलेली काँग्रेस (Congress) पुन्हा उभारी घेऊ लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा खासकरून राहुल गांधी यांचा फाजील आत्मविश्वास वाढला. संसदेत गर्विष्ठ, विधिनिषेधशून्य, असंवेदनशील भाषा वापरून राहुल गांधी यांनी त्यांची संस्कृती दाखवून दिली. परदेशात जाऊन भारताच्या विरोधात भूमिका मांडणे, जात्यंधता करणे, अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करणे, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर खोटेनाटे आरोप करणे या राहुल गांधी यांचा वर्तवणुकीमुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात कर्नाटक आणि तेलंगणा वगळता कुठेही काँग्रेसची सत्ता आली नाही. हरियाणात मजबून पराभव झाला आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा २०१४च्या परिस्थितीवर आणून ठेवले आहे.
(हेही वाचा Maharashtra Assembly Election मध्ये सर्व पक्षातील १७ दिग्गजांचा झाला पराभव)
फाजील आत्मविश्वास
काँग्रेसला (Congress) कायम मोठा भाऊ असल्याची जाणीव होत असते, कितीही पराभव झाला तरी आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आमचा तळागाळातील पक्ष आहे, हा विचार काँग्रेसने २०१४च्या दारुण पराभवानंतरही मनात कायम ठेवला. काँग्रेसची सवय आहे, ‘आम्हाला महत्व दिले नाही तर कुणाची हित होऊ देणार नाही.’ त्यामुळे २०१९च्या लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिली, पण काँग्रेसने जागा वाटपात प्रादेशिक पक्षांना क्षुल्लक महत्व दिले, अखेर स्वतंत्र निवडणूक लढवली, त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेसला पुन्हा पराभव पत्करावा लागला. २०२४मध्ये मात्र काँग्रेसने चूक सुधारत उत्तरप्रदेशसह अन्य राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेस तरली, पण दिल्ली, पंजाब आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा फाजील आत्मविश्वास वाढला आणि काँग्रेस हरियाणात सपाटून हरली. महाराष्ट्राच्या निवडणुकीतही जागा वाटपात मोठ्या भावाच्याच भूमिकेत राहण्याच्या विचारावर ठाम राहिली. त्यासाठी मविआतील घटक पक्षांशी शेवटपर्यंत संघर्ष करत राहिली. हा वाद मविआत फूट पडेल इथपर्यंत पोहचला होता. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. इथेही काँग्रेसने आम्हाला महत्व दिले नाही तर कुणाची हित होऊ देणार नाही, अशीच भूमिका ठेवली आणि बंडखोर उभे केले.
हिंदू वोट बँक आजही कायम
या निवडणुकीने पुन्हा ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेची आठवण करून दिली आहे. कायम हिंदू विरोधी भूमिका घेत असताना मुसलमानांचे लांगुलचालन करणे, एक गठ्ठा मतांचे राजकारण करणे, जातीय राजकारण करणे या तत्वानुसार काँग्रेसने (Congress)७० वर्षे देशावर राज्य केले. त्यासाठी हिंदूंना कायम दुय्यम स्थान दिले. २०१४ मध्ये पहिल्यांदा हिंदू वोट बँक तयार झाली आणि काँग्रेसच्या ७०वर्षांच्या राजकारणाचा डोलारा जमीनदोस्त झाला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी खोटे म्हणून का होईना मंदिरांमध्ये जायला सुरुवात केली, कापला टिळा लावून फिरायला सुरुवात केली, पण तो त्यांचा दिखावा होता हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर लक्षात आले. कारण त्यानंतर राहुल गांधी मुसलमान, दलित, आदिवासी, ओबीसी विरुद्ध भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे समीकरण मांडू लागले. एकाच वेळी मुलसमानांना चुचकारु लागले आणि जातीगणनाची मागणी करत दुसरीकडे दलित, आदिवासी, ओबीसी या हिंदू धर्मातील घटकांना भडकवण्याचे धोरण पुढे रेटत राहिले. ७० वर्षांपूर्वी काँग्रेसने जे फोडाफोडीचे राजकारण केले, तेच राजकारण पुन्हा सुरु केले, पण २०१४मध्ये तयार झालेली हिंदू वोट बँक आजही अस्तित्वात आहे, हा संदेश काँग्रेसला २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिला आहे. त्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या संदेशाने केवळ हिंदूंना जागृत करण्याची गरज होती, ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली.
Join Our WhatsApp Community