सगळ्यांना मान्य आहे तर मग अडतंय कुठे? आरक्षणावरुन राज ठाकरेंचा सवाल

निव्वळ मराठा तरुणांची डोकी भडकवायची आहेत का, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

228

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरुन सरकारला कायमंच विरोधकांच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या सर्व विषयाबाबत आजवर शांत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता याबाबतीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींचे राजकीय आणि मराठ्यांचे आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे, तर मग अडतंय कुठे? असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. मनसेच्या पुणे शहर कार्यालयातील उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

निव्वळ डोकी भडकवायचा प्रयत्न

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधा-यांना सवाल केला आहे. ज्यावेळी सगळ्यात आधी मराठा मोर्चा निघाला होता तेव्हा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण मागणा-या मोर्चेक-यांची भेट घेतली होती. याचाच अर्थ त्यावेळी सगळ्यांना आरक्षण मान्य होतं. असं असेल तर मग आता अडतंय कुठे? का निव्वळ मराठा तरुणांची डोकी भडकवायची आहेत का, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

(हेही वाचाः आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक लांबणीवर टाका! काँग्रेसची आग्रही मागणी)

एकत्र या आणि तोडगा काढा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुद्धा सर्वांचे एकमत आहे, तर मग सरकार आपली बाजू न्यायालयात नीट का मांडत नाही? एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा सर्वांनी एकत्र या आणि यावर काय तो तोडगा काढा, असा सल्लाही राज यांनी दिला आहे.

समाजाने जाब विचारायला हवा

जे आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडून येतात त्यांना जनतेने जाब विचारायला हवा. निवडणुका लागल्या की मत मागायला येणा-या आपल्या नेत्याला मराठा आणि ओबीसी समाजाच्या जनतेने आरक्षणाबाबत जाब विचारायला हवा. आपला मतांसाठी वापर तर केला जात नाही ना, याचा विचार समाजाने करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार! प्रसाद लाडांची काँग्रेस आंदोलनावर टीका)

यंत्रणांचा गैरवापर

केंद्रीय तपास यंत्रणांचा कायमंच गैरवापर होत आला आहे. याआधी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही या यंत्रणांचा गैरवापर झाला आणि आताही तेच होत आहे. केंद्रीय यंत्रणा या काही तुमच्या हातातल्या बाहुल्या नाहीत. जो माणूस आपल्याला नको त्याला संपवण्यासाठी जर या यंत्रणांचा वापर होत असेल आणि गुन्हे केलेले मोकाट फिरत आसतील, तर ते चुकीचे आहे. अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर सुद्धा अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसेच एकनाथ खडसेंच्या सीडीची मी वाट पाहत आहे, असेही ते म्हणाले.

निवडणुकांसाठी मनसेची तयारी

मनसेने आगामी महापालिका निवडणुकांसाठी आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, पुढील आठवड्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. १६ ते १८ जुलै असा तीन दिवसांचा नाशिक दौरा ते करणार आहेत. नाशिकमध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात आलेली मरगळ झटकून मनसेला बळकटी देण्यासाठी हा दौरा करणार आहेत.

(हेही वाचाः राज ठाकरे पुन्हा मैदानात! ‘असा’ असणार दौरा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.