Veer Savarkar आणि शिरगांव येथील दामले कुटुंब यांची २७ नोव्हेंबरची अशीही एक आठवण…

80
हिंदु संघटक आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शिरगांव येथील दामले घराण्याशी निकटचा संबंध
हिंदु संघटक आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शिरगांव येथील दामले घराण्याशी निकटचा संबंध
रविंद्र दामले, शिरगांव

२३ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना २५ वर्षांची पहिली आणि ३० जानेवारी १९११ रोजी २५ वर्षांची दुसरी अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. जनतेच्या सततच्या आग्रहाच्या मागणीवरून दिनांक ६ जानेवारी १९२४ रोजी सावरकरांची कारावासातून सुटका झाली; परंतु सुटका होताना त्यांच्यावर दोन अटी लादण्यात आल्या होत्या. १. पाच वर्षांपर्यंत त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग घ्यावयाचा नाही आणि २. सरकारच्या पुर्वपरवानगीशिवाय रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर कुठे जावयाचे नाही, कारावासातून सावरकरांची सुटका झालेली असली तरी ती सशर्त होती. संपर्काची साधने फारच कमी असलेल्या अशा त्या वेळच्या रत्नागिरीत सावरकरांना स्थानबध्द केले होते. गुप्तचरांचा सतत पहारा असे. सन १९२४ ते सन १९३७ या काळात तात्याराव सावरकरांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. पाच वर्षापर्यत राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग घ्यावयाचा नाही ही अट पुढे १९३७ सालापर्यत सतत वाढविण्यात आली. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Special Editorial : उतू नका, मातू नका… हिंदुत्वाचा वसा सोडू नका!)

अशा या महान देशभक्ताचा आमच्या दामले घराण्याशी निकटचा संबंध जडला. त्याचे असे झाले की, १९२४ साली रत्नागिरीमध्ये प्लेगची साथ होती. म्हणून सावरकरांनी रत्नागिरी (Ratnagiri) जवळच्या शिरगांव गावी स्थलांतर करण्याचे ठरविले. सरकारचा आपल्यावर रोष ओढवेल या भीतीने सावरकरांना रहाण्यासाठी जागा देण्यास कोणी तयार होईना. अशा स्थितीत माझे पणजोबा कै. विष्णुपंत काशिनाथ दामले यांनी सावरकरांना आपल्या घरी राहायला येण्यासाठी आमंत्रण दिले. आमचे घर जुने, सोयी फारशा नाहीत, अशा घरांत सावरकारांसारख्या थोर देशभक्ताला रहायला जागा देणे हे कितपत योग्य होईल, ही शंकाच होती. तथापि सावरकरांनी येवुन घर पाहिले व राहायला येण्याचे ठरविले. सावरकरांनी आमच्या घरी आल्यावर रहाण्यासाठी जी खोली पसंत केली होती, ती खोली आम्ही भात साठवणुकीसाठी भाताचे कोठार म्हणून वापरत असू. ही खोली बारा फूट लांब आणि सात फूट रूंद एवढी लहान असून त्याला फक्त एक दार आणि एक लहानशी खिडकी होती. त्यातून उजेड फारसा येत नसे. म्हणून आमच्या पणजोबांनी सावरकरांना विचारले की, तात्यासाहेब एवढी लहान खोली आपल्याला रहाण्यासाठी पुरेल का? त्यावर सावरकर उत्तरले..

विष्णुपंत आधी पहिली गोष्ट म्हणजे मी तात्यासाहेब नाही. मला नुसतेच तात्या म्हणुन हाक मारणे तुम्हाला कसेतरीच वाटत असेल तर तात्याराव म्हणा आणि दुसरे म्हणजे या खोलीबदद्ल म्हणत असाल तर अंदमानात मी याही पेक्षा लहान, अस्वच्छ आणि काळोख्या खोलीत राहात होतो, तेव्हा अशा खोलीत राहाण्याची मला सवय आहे आणि अंदमानची ओळख एवढयातच विसरणे इष्ट नाही. असे सांगून आमचे घरी राहायला येण्याचे निश्चित केले, अशा रितीने सावरकरांचे आमच्या घरात वास्तव्य सुरू झाले.

२७ नोव्हेंबर १९२४ पासून २० जून १९२५ पर्यंत तात्याराव सावरकर आमचे शिरगांव येथील घरात वास्तव्याला होते. माझे आजोबा कै. मोरेश्वर विष्णु दामले हे त्या वेळी १६ वर्षांचे होते. सावरकरांच्या वास्तव्यात माझ्या आजोबांना त्यांचा सहवास लाभला होता. शिरगांवातील वास्तव्यात सावरकर लिखाण करीत असत, त्या लिखाणाच्या प्रती तयार करणे त्या निरनिराळ्या वर्तमानपत्रात देणे ही कामे माझे आजोबा त्या वेळी करीत असत. सावरकर आमचे घरी वास्तव्यास असताना त्यांचा दिनक्रम, शिरगांवातील त्यांचे सामाजिक कार्य सहभोजन, अखिल महिलांचे हळदीकुंकू, सावरकरांना भेटायला येणारी थोर मंडळी अशा ठळक घटना, तसेच काही घरगुती स्वरूपाच्या आठवणी माझ्या आजोबांना होत्या. त्या आठवणी माझ्या आजोबांनी शब्दबध्द करून ‘सावरकर स्मृती’ या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आमच्या वास्तुला भेट देण्यासाठी, सावरकर वास्तव्यास असलेली खोली पाहाण्यासाठी अनेक सावरकर प्रेमी मंडळी आजही आवर्जून येत असतात. या वास्तुमध्ये आमची चौथी पिढी रहात असून सावरकरप्रेमी मंडळींना ही खोली दाखवितांना आणि सावरकरांच्या वास्तव्याविषयी माहिती देताना आजही आम्हाला आनंद होतो आणि एक महान देशभक्त आमच्या वास्तुत रहायला होते, या गोष्टीचा अभिमान वाटतो. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.