- प्रतिनिधी
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी राज्यातील नेते सोमवारी भाजपा (BJP) हायकमांडशी चर्चा करण्याकरिता दिल्लीत येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोमवारी सायंकाळी दिल्लीत येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ते गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. उभय नेत्यांची बैठक अमित शहा यांच्या निवासस्थानी होण्याची शक्यता आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीचे सोमवारी दिल्लीत लग्न आहे. यात सहभागी होण्यासाठी देशभरातील नेते दिल्लीत येत आहेत. महाराष्ट्रातील नेते सुद्धा या लग्नाला जाणार आहेत. यानंतर अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. (BJP)
(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मुंबईत ३२ पैकी २५ विद्यमान आमदार पुन्हा विजयी;, मात्र कुणाचे मताधिक्य घटले?)
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उभय नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत काहीही कळू शकलेले नाही. मात्र, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीचे लग्न आहे. त्या लग्नासाठी दिल्लीत आलो आहे. सोबतच भाजपातील काही ज्येष्ठ नेत्यांची भेटी घेत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजपाचा कार्यकर्ता हायकमांडकडे काहीही मागत नाही आणि मागायला आला नाही म्हणून हायकमांडकडून सुद्धा कुणावर अन्याय होत नाही, ही भाजपाची परंपरा आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. (BJP)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला न भुतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना परममित्र असे म्हटले होते. यामुळे विधानसभेच्या यशानंतर महाराष्ट्राची धुरा फडणवीस यांच्याच हाती दिली जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, याबाबत हायकमांडकडून कोणताही ग्रीन सिग्नन अद्याप मिळालेला नाही. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community