- विशेष प्रतिनिधी, मुंबई
सन २०१९मध्ये ज्या उमेदवाराचा पत्ता भाजपाने कापला होता, त्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावे लागले. हा प्रकार घडला आहे भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये. भांडुपमध्ये शिवसेनेचे उमेदवार अशोक पाटील हे निवडून आले असले तरी सन २०१९च्या निवडणुकीत भाजपाने याच अशोक पाटलांचा पत्ता तत्कालिन शिवसेनेला कापायला लावून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी मिळवून दिली होती. परंतु आता त्याच रमेश कोरगावकर यांच्या पराजय करून शिवसेनेचे उमेदवार अशोक पाटील यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. (Assembly Election Result 2024)
भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान उबाठा शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर यांच्यासह मनसेचे शिरीष सावंत आणि शिवसेनेचे अशोक पाटील हे निवडणूक रिंगणात होते. कोरगावकर यांच्यासमोर प्रबळ आव्हान मनसेचे शिरीष सावंत यांचे मानले जात होते आणि शिवसेनेचे अशोक पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर जाईल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात या निवडणुकीत रमेश कोरगावकर यांना ७० हजार ९९० मते मिळाली तर शिवसेनेचे अशोक पाटील यांना ७७ हजार ७५४ मतदान झाले. तर मनसेचे शिरीष सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना केवळ २३ हजार ३३५ मतदान झाले. (Assembly Election Result 2024)
(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मुंबईत १८ माजी नगरसेवकांनी आजमावले आमदारकीसाठी नशीब, फक्त तिघांनाच मिळाले यश)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना सुमारे ५ हजारांचे मताधिक्य भांडुप मतदारसंघातून मिळाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात असतानाच त्यातच स्वत: रमेश कोरगावकर हे निवडणूक रिंगणात असल्याने त्यांना हरवणे कठिण मानले जात होते. परंतु तिथे माजी आमदार अशोक पाटील हे तब्बल ६७६४ मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हातात हात घालून काम केल्याने अशोक पाटील यांना विजयी होता आले. (Assembly Election Result 2024)
सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अशोक पाटील यांनी भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांचा पराभव केला होता. त्यानंतर सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून मनोज कोटक हे निवडून आले होते. या निवडणूक प्रचारात तत्कालिन शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या रमेश कोरगावकर यांनी कोटक यांच्यासाठी तसेच युतीधर्म बाळगत काम केल्याने कोटक यांच्यासाह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरगावकर यांच्या नावासाठी आग्रह धरला. त्यामुळे तिकीट देण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशोक पाटील आणि रमेश कोरगावकर यांच्या नावात एकमत होत नव्हते. अखेर कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर करून पाटील यांचा पत्ता कापला गेला होता. त्यामुळे शिवसेनेत अशोक पाटील हे नाराज होते. (Assembly Election Result 2024)
(हेही वाचा – Virat Kohli : विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रुममध्ये गंभीर, विराटची भावपूर्ण गळाभेट)
त्यातच जुलै २०२२मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव केल्यानंतर उबाठा शिवसेना पक्ष सोडून अशोक पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत अशोक पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांना भाजपाचा पाठिंबा असेल आणि त्यामुळे अशोक पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील असे बोलले जात होते. परंतु भाजपाने पूर्ण ताकदीनिशी मतदानात भाग घेतल्यामुळे अशोक पाटील यांचा विजय झाल्याचे दिसून येत आहे. अशोक पाटील विजयी झाल्यानंतर त्यांनी माजी खासदार मनोज कोटक यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. त्यामुळे ज्या कोटक आणि भाजपामुळे अशोक पाटील यांचा पत्ता कापला गेला होता, त्याच अशोक पाटील यांना आमदार बनवण्याचेही काम मनोज कोटक आणि भाजपानेच केल्याचे स्पष्ट होत आहे. भांडुपमध्ये कोटक यांचे चांगले काम असल्याने या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने कोटक यांच्यावर सोपवल्याने अशोक पाटील यांचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जुनी मैत्री जपत अशोक पाटील यांना मदत करत त्यांच्या विजयात आपले योगदान दिल्याचेही बोलले जात आहे. (Assembly Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community