कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई लेव्हल-3 मध्ये असल्याने काही नियम शिथिल करत अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने विक्रेत्यांना ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. परंतु कोविडच्या या नियमांचे पालन करण्याऐवजी दादरमध्ये पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने चार नंतरही दुकाने सुरू ठेवली जात होती. याबाबतचे चित्रीकरण करुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांचे रेटकार्डच जाहीर केले होते. देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून निदर्शनास आणलेल्या या घटनेची दखल कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेऊन या सर्व परिमंडळीय पोलिस उपायुक्तांना कोविडच्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करताना पोलिसांकडून गैरप्रकार होत असल्याचे दिसून आल्यास, त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वसुलीचे नवे रेटकार्ड
कोविड काळात शासन तसेच महापालिका प्रशासन यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन न करता दादर परिसरातील काही दुकाने दुपारी 4 वाजल्यानंतर सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. दुपारी चारनंतर सुरू असलेल्या या दुकानांमागे आर्थिक गणित असल्याचीही चर्चा दादरमध्ये ऐकायला येत होती. याच पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी चार नंतर कशाप्रकारे दुकाने सुरू आहेत, याचा पुरावाच चित्रण करत समोर आणला. याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करतानाच देशपांडे यांनी आधी वसुली बार मालकांकडून, आता वसुली व्यापाऱ्यांकडून. मुंबईत कोविडच्या नावाखाली नवीन वसुली मोहीम सुरू… मोठे दुकान ५००० रुपये, मध्यम दुकान २००० रुपये आणि छोटे दुकान १००० रुपये वसुलीचे नवे रेटकार्डच देशपांडे यांनी उघडकीस आणले.
आधी वसुली बार मालकांकडून…
आता वसुली व्यापाऱ्यांकडून…!
मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू…..सायंकाळी चार नंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान 5000मध्यम दुकान2000छोटे दुकान1000 वसुली चे नवे रेट कार्ड pic.twitter.com/6rnZUxShkX— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 9, 2021
(हेही वाचाः बार मालकांनंतर आता व्यापाऱ्यांकडून ‘वसुली’? )
विश्वास नांगरे-पाटील यांचे निर्देश
सोशल मीडियावर त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिस सहआयुकत विश्वास नांगरे पाटील यांनी परिमंडळीय पोलिस उपायुक्तांना निर्देश देत, कोविड-१९च्या अनुषंगाने लागू झालेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले. देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांत व्हीडिओ शेअर करुन मुंबईत ठराविक रक्कम घेऊन वेळेची मर्यादा संपल्यानंतर दुकाने उघडी ठेवली जातात, असे म्हटले आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून त्यामुळे जनमानसांत पेालिस दलाची प्रतिमा मलीन होऊ शकते, असे त्यांनी या निर्देशात स्पष्ट केले. कोविड निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केल्यानंतरही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आपल्या भागात अशा स्वरुपाचे प्रकार होणार नाही याची आपण स्वत: खा़त्री करावी. याबाबत अधिनस्त अंमलदार यांना देखील अवगत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
देशपांडे यांनी मानले आभार
याबाबत बोलताना मनसेचे संदीप देशपांडे यांनी सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे विशेष आभार मानले. कारण हा व्हिडिओ कोविडच्या नियमांचे पालन होत नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन कशाप्रकारे पैसे उकळले जातात, हे लक्षात आणून देण्यासाठी केला होता. जर ही दुकाने पैसे देऊन रात्री आठवाजेपर्यंत सुरू राहत असतील, तर त्यांना ती खुली ठेवण्यास परवानगी द्यायला सरकार आणि महापालिकेला काय हरकत आहे. त्यामुळे सरकार आणि महापालिकेने या दुकानांना ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास रितसर परवानगी द्यावी. जेणेकरुन त्या व्यापाऱ्यांनाही रितसर व्यवसाय करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः सगळ्यांना मान्य आहे तर मग अडतंय कुठे? आरक्षणावरुन राज ठाकरेंचा सवाल)
Join Our WhatsApp Community