- ऋजुता लुकतुके
बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत भारताच्या डी गुकेशने दुसरा डाव बरोबरीत सोडवला आहे. चीनचा जगज्जेता डिंग लिरेननेही लगेचच बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. सोमवारी पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशला ४१ चालींमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. वेळेच्या बाबतीत तो खूपच मागे पडला. शिवाय मध्यावर राण्यांची केलेली अदलाबादल त्याला महागात पडली. सुरुवातीच्या झटक्यामुळे गुकेश मंगळवारी सावध होता.
‘काळे मोहरे घेऊन खेळताना सामना बरोबरीत सुटणं कधीही चांगलं. हा चांगला निकाल आहे. अजून १२ लढती बाकी आहेत. त्यामुळे निकालाविषयी आताच भाष्य करायला नको,’ असं १८ वर्षीय गुकेश सामन्यानंतर बोलताना म्हणाला. १८ वर्षीय गुकेश हा जगज्जेत्याला आव्हान देणारा वयाने सगळ्यात लहान आव्हानवीर आहे आणि फारशा फॉर्मात नसलेल्या डिंग लिरेनला हरवून जगज्जेतेपद पटकावण्याचं त्याचं स्वप्न आहे. तसं झालं तर विश्वनाथन आनंद नंतर तो भारताचा फक्त दुसरा जगज्जेता असेल.
(हेही वाचा – MVA नेत्यांनी पराभवाचा राग दूध उत्पादक शेतकऱ्यांवर काढला! रोज ५ कोटींचे नुकसान!!)
Game 2 ended in a draw after a threefold repetition at the 2024 FIDE World Championship Match, presented by Google. #DingGukesh
📷 Eng Chin An pic.twitter.com/XVmIZSkAWB
— International Chess Federation (@FIDE_chess) November 26, 2024
‘जगज्जेतेपदाची अंतिम फेरी खेळताना दडपण येणं स्वाभाविक आहे. या लढतीतही दडपण आहेच. पण, मी खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो आहे. दडपणापेक्षा मी हा विचार करतो की, मी माझ्या देशाला आणि १.४ अब्ज लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे, ही मानाची गोष्ट आहे,’ असं गुकेश सामन्यानंतर बोलताना म्हणाला.
तसंच रणनीतीविषयी बोलताना तो म्हणाला की, एकावेळी एकाच लढतीचा विचार तो करणार आहे. फार पुढचा विचार तो करणार नाही. जगज्जेतेपदाची ही लढत सिंगापूरमध्ये होत आहे. आणि १४ डावांच्या या लढतीत ७.५ गुण प्रथम जिंकणारा खेळाडू जगज्जेता ठरेल. शिवाय विजेतेपदासाठी असलेले २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरही त्या खेळाडूला मिळतील.
भारताकडून विश्वनाथन आनंदने ५ वेळा जगज्जेतेपद पटकावलं आहे. आणि भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात आनंदचं स्थान महत्त्वाचं आहे. आताही गुकेशच्या जडणघडणीत आनंदचा मोठा वाटा आहे. जगज्जेतेपदाच्या तिसऱ्या लढतीपूर्वी आता एका दिवसाची विश्रांती आहे. पुढील लढत गुरुवारी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community