BMC : पिण्याच्या पाण्याच्या तिप्पट दराने टँकरचे पाणी खरेदी करत महापालिकेने धुतले रस्ते! 

213
BMC : पिण्याच्या पाण्याच्या तिप्पट दराने टँकरचे पाणी खरेदी करत महापालिकेने धुतले रस्ते! 
BMC : पिण्याच्या पाण्याच्या तिप्पट दराने टँकरचे पाणी खरेदी करत महापालिकेने धुतले रस्ते! 
  • सचिन धानजी,मुंबई
धुळ मुक्त मुंबईसाठी येथील रस्ते पाण्याने धुतले गेले. यासाठी संपूर्ण मुंबईभर २००हून अधिक टँकरची सेवा घेऊन या पाण्याने रस्ते अविरत धुण्याचा प्रयत्न केला. मात्र,  हे रस्ते  धुण्यासाठी वापरलेल्या टँकरच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या खर्चाच्या तुलनेत तिप्पट दराने पैसे मोजले गेल्याची माहिती समोर आली आहे. जिथे पिण्याच्या पाण्याचा दहा हजार लिटरच्या एका टँकरसाठी सरासरी २२०० ते ३००० रुपये एवढे मोजले जातात, तिथे रस्ते धुण्यासाठी वापरलेल्या तेवढ्याच क्षमतेच्या पाण्याच्या टँकरसाठी महापालिकेने ६६०० ते ७२०० रुपये खर्च  केले आहे.  त्यामुळे धुळमुक्तीची नावावर  टँकरसह पाण्यावर खर्च करत एकप्रकारे कंत्राट कंपन्यांवर पाण्यासारखा पैसा ओतल्याचे  दिसून आले आहे. (BMC)
 बांधकामांच्या बाजूचे रस्ते धुण्याचे निर्देश
मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने मुख्यमंत्र्यांनी धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच शहर व उपनगरांची एकंदर स्वच्छता सुधारण्यासाठी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कोस्टल रोड प्रकल्प, मेट्रोची कामे, अतिरहदारीचे रस्ते आदी प्रमुख बांधकामांच्या बाजूचे रस्ते धुण्याचे निर्देश दिले होते. (BMC)
तातडीने कृती आराखडा तयार
त्यानुसार मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि धूळ प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि रोखण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. (BMC)
दररोज सुमारे २१२ पाण्याच्या टँकरचा वापर 
धुळीचे प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांपैकी एक उपाय म्हणजे सार्वजनिक रस्ते उच्चदाबाच्या पाण्याने स्वच्छ करणे. त्यामुळे शहर व उपनगरांची एकंदर स्वच्छता वाढण्यास मदत होईल. सार्वजनिक रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करणे हे महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. स्वच्छता मोहिमेसाठी पाण्याचे टँकर तैनात करून निर्माण होणा-या धुळीचे प्रभावी पणे व्यवस्थापन केले जावे यासाठी पाच हजार आणि नऊ हजार लिटर क्षमतेच्या एकत्र मिळून दररोज सुमारे २१२ पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात आला. (BMC)
सुमारे ६७७ किलोमीटर लांबीचे  ३७७ रस्ते धुतले 
त्यानुसार मुंबई महापालिकेने सुमारे ६७७ किलोमीटर लांबीचे  ३७७ रस्ते स्वच्छतेसाठी निश्चित केले. महापालिकेच्या सात झोनमध्ये सात संस्थांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत ही सेवा घेत सखोल स्वच्छता अभियानांतर्गत तीन महिने हे रस्ते स्वच्छ केले असे महापालिकेचे म्हणणे आहे. (BMC)
सुमारे पाच कोटी  रुपयांचा खर्च
महापालिकेने रस्ते धुण्यासाठी वापरलेल्या टँकरच्या पाण्यावर केलेल्या खर्चाबाबत खासगी टँकर मालकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पिण्याच्या दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्यासाठी सरासरी २२०० ते ३००० रुपये शुल्क आकारले जाते. तर पाच हजार लिटरच्या टँकर पाण्यासाठी ९०० ते  १२०० रुपये आकारले जाते. तर पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याच्या टँकरसाठी दहा हजार लिटरसाठी १४०० ते १५०० रुपये आणि पाच लिटर क्षमतेच्या टँकरसाठी सुमारे ७५० रुपये आकारले जाते. त्यामुळे पिण्यास योग्य नसलेल्या पाण्याच्या तुलनेत सहा पट तर पिण्यायोग्य पाण्याच्या तुलनेत तिप्पट दराने पाणी खरेदी करून रस्ते धुतल्याची माहिती अधिकारातून बाब समोर आली आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. (BMC)
प्रत्येक टँकरला जेटींग व्यवस्था असली तरी…
महापालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेटींग व्यवस्थेसह पाण्याच्या टँकरची सेवा घेतली होती, त्यामुळे टँकरच्या पाण्याचा खर्च दिसून येत असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्येक टँकरला अशाप्रकारे जेटींग व्यवस्था असली तरी तो  एकदाच होणारा खर्च असल्याने प्रत्येक टँकरच्या पाण्याचा दर काही अंशी वाढणे योग्य होते, पण तो  तिप्पट आणि सहा पट वाढणे हेच मुळी या खर्चावर संशय व्यक्त करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे या खर्चावर ऑडिटर काय ताशेरे मारतात, या कडे सर्वांचे लक्ष असेल. (BMC)
महापालिकेने अशाप्रकारे नेमल्या होत्या टँकर पुरवण्यासाठी संस्था
परिमंडळ १
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ३८०० रुपये
एकूण फेरी : ८९१
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ६९०० रुपये
एकूण फेरी :  ५६७
एकूण खर्च : ७२ लाख ९८हजार १०० रुये
संस्थेचे नाव :  लक्ष्य एंटरप्रायझेस
परिमंडळ २
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ३८०० रुपये
एकूण फेरी :  १०५३
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ७२०० रुपये
एकूण फेरी :  ४०५
एकूण खर्च :  ६९ लाख १७ हजार ४०० रुपये
संस्थेचे नाव :  लक्ष्य एंटरप्रायझेस
परिमंडळ ३
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ५४२४ रुपये
एकूण फेरी :  ८१०
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ७०४४रुपये
एकूण फेरी :  ४०५
एकूण खर्च :   ७२ लाख ४६ हजार २६० रुपये
संस्थेचे नाव :  अंशुमन अँड कंपनी
परिमंडळ ४
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ४९९५ रुपये
एकूण फेरी :  ७२९
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ७२०० रुपये
एकूण फेरी :  ८१०
एकूण खर्च :  ९४ लाख ७३ हजार ३५५ रुपये
संस्थेचे नाव :  सास असोशिएट्सच
परिमंडळ ५
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ५५०४ रुपये
एकूण फेरी :  ६४८
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ७००७ रुपये
एकूण फेरी :  ३२४
एकूण खर्च :  ६९ लाख १७ हजार ४०० रुपये
संस्थेचे नाव :  श्री चंद्रमा वॉटर सप्लाय कंपनी
परिमंडळ ६
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ५५०५ रुपये
एकूण फेरी :  ५६७
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ७००८ रुपये
एकूण फेरी :  ४०५
एकूण खर्च :  ५९ लाख ५९ हजार ५७५ रुपये
संस्थेचे नाव :  अंशुमन अँड कंपनी
परिमंडळ ७
पाच हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च : ४९२६ रुपये
एकूण फेरी :  ७२९
दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर फेरीचा खर्च :  ६६६६रुपये
एकूण फेरी :  २४३
एकूण खर्च :   ५२ लाख १० हजार ८९२ रुपये
संस्थेचे नाव : आरती कॉर्पोरेशन 
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.