Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ?

Shaktikanta Das : शक्तिकांत दास यांचा कार्यकाल २ वर्षांनी वाढवला जाऊ शकतो.

37
Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना तिसऱ्यांदा मुदत वाढ मिळू शकते. मनीकंट्रोल या वेबसाईटने ही एक्सक्लुझिव्ह बातमी दिली आहे. यावेळी त्यांची मुदत २ वर्षांनी वाढण्याचा अंदाज वेबसाईटने व्यक्त केला आहे. तसा प्रस्तावच नियुक्ती मंडळाकडे करण्यात आला आहे. शक्तिकांत दास यांचं केंद्रातील महायुती सरकारशी आर्थिक धोरणांवरून चांगलं जमतं. त्याचंच हे फलित असल्याचंही बातमीत म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाल ३ वर्षांचा असतो. पण, ही संपूर्ण मुदतवाढ त्यांना मिळेल का हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ‘१२ डिसेंबरला शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांचा कार्यकाळ संपतो आहे. पण, आताच्या घडीला त्यांना २ वर्षांची मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे,’ असं सूत्रांनी सांगितलं आहे. गव्हर्नरच्या नियुक्तीसाठी अर्थ मंत्रालयातून शिफारस जाते आणि ती अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेट म्हणजेच मंत्रिमंडळाच्या नियुक्ती मंडळासमोर ठेवली जाते. हे मंडळ नियुक्तीवर विचार करतं.

(हेही वाचा – Bajrang Punia : बजरंग पुनियावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी)

सध्या अर्थ मंत्रालयाकडून तशी शिफारस गेल्याचं समजतंय. सध्या देशात महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती. अशावेळी गव्हर्नरच्या नियुक्तीचं काम रखडलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनंही नोव्हेंबरमध्येच शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना मुदतवाढ मिळणार असल्याची बातमी सर्वप्रथम दिली होती.

जर मुदतवाढ मिळाली तर दास हे सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेले तिसरे रिझर्व्ह बँक गव्हर्नर ठरतील आणि ही मुदतवाढ १ वर्षांहून जास्त झाली तर सगळ्यात जास्त काळ गव्हर्नर राहिल्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा होईल. २०१८ मध्ये उर्जित पटेल यांच्या जागी दास यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती. आपल्या ६ वर्षांच्या कार्यकाळात दास (Shaktikanta Das) यांना ग्लोबल फायनान्स या प्रतीष्ठेच्या संस्थेकडून दोनदा सर्वोत्कृष्ट गव्हर्नरचा पुरस्कार मिळाला आहे. कोव्हिड आणि त्यानंतर युद्ध परिस्थितीत देशाचा आर्थिक गाडा सक्षमपणे हाताळल्याबद्दल हा मान त्यांना मिळाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.