- प्रतिनिधी
सेवानिवृत्त जहाजावरील कॅप्टन यांची ‘शेअर्स ट्रेडिंग’च्या नावाखाली झालेल्या अकरा कोटींच्या सायबर फसवणुकी प्रकरणी सायबर गुन्हे शाखा आणि आणि सायबर पोलिसांनी डोंगरी येथून एकाला अटक केली आहे. कैफ इब्राहिम मन्सुरी (३१) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळून ३३ डेबिट कार्ड आणि १२ चेकबुक जप्त केले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा पूर्वी बँकेत नोकरी करीत होता अशी माहिती समोर येत असून, तो परदेशात बसलेल्या सायबर माफियांसाठी बँकेत खाते उघडून देण्याचे काम करीत होता अशी माहिती समोर येत आहे. (Cyber Fraud)
कुलाबा येथील सेवानिवृत्त जहाज कप्तानची ‘शेअर्स ट्रेडिंग’ घोटाळ्याद्वारे सायबर माफियांनी ११ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरु होता. अन्या स्मिथ नावाच्या एका महिलेने कप्तान यांचा मोबाईल क्रमांक एका व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर जोडला होता. या ग्रुपमध्ये त्यांनी माहिती अपलोड केली आणि सहकारी सदस्यांना विचारले की ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत का?. व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजला कप्तान यांनी दुजोरा देत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास संमती दर्शवली. यानंतर स्मिथ नावाच्या महिलेने तक्रारदार कप्तान यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये जोडले आणि एक लिंकही शेअर केली. तक्रारदाराने लिंकवर क्लिक करून ट्रेडिंगसाठी कंपनीचे ॲप डाउनलोड केले. यानंतर त्यांना स्मिथ आणि तिच्या सहकाऱ्यांकडून संस्थात्मक खाते ट्रेडिंग, ओटीसी ट्रेडिंग, आयपीओ इत्यादींबाबत संदेश मिळू लागले. स्मिथ आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिफारस केलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवायला लावले. ५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान, तक्रारदाराने आरोपींच्या निर्देशानुसार २२ व्यवहारांमध्ये ११.१६ कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये पाठवले होते. (Cyber Fraud)
(हेही वाचा – Dapoli Agricultural University ची आंबा उत्पादनाबाबत अनास्था; सरकारने लक्ष घालण्याची शेतकर्यांची मागणी!)
आपली फसवणूक झाल्याचे कप्तान यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाचा तपास सायबर गुन्हे शाखा आणि दक्षिण सायबर पोलीस ठाणे यांनी सुरु केला होता. पोलिसांच्या तपासात कप्तान यांनी ज्या बँक खात्यावर २२ व्यवहार केले त्या खात्यांपैकी आयडीएफसी बँकेतून धनादेशामार्फत एका महिलेने ६ लाख रुपये काढल्याचे पोलिसांनी आढळून आले. बँकेकडून या महिलेची माहिती मिळवून या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत डोंगरी परिसरात राहणारा कैफ इब्राहिम मन्सुरी याने तिला धनादेश देऊन पैसे काढण्यास सांगितले होते. पोलिसांनी तात्काळ कैफ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वेगवेगळ्या लोकांच्या नावे असलेले ३३ डेबिट कार्ड आणि १२ चेकबुक जप्त केले आहे. (Cyber Fraud)
या प्रकरणात कैफला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत कैफ हा पूर्वी बँकेत नोकरीला होता, व त्याने परदेशात असलेल्या सायबर माफियांच्या सांगण्यावरून मुंबईतून बँक खाते उघडून देण्याचे काम करीत होता. फाइफ याने झोपडपट्टी तसेच गरीब मजूर यांना पैशांचे आमिष दाखवून मुंबईतील विविध बँकामध्ये त्यांचे बँक खाते उघडून बँकेकडून व्हिसा कार्ड, डेबिट कार्ड आणि चेकबुक मिळवले होते. व्हिसा कार्ड त्याने परदेशात बसलेल्या सायबर माफियांना पाठवले असून चेकबुक आणि डेबिट कार्ड त्याच्याकडे ठेवले होते. उघडण्यात आलेल्या बँक खात्यांवर कोट्यवधींचा व्यवहार झाला असून त्यातून कमिशन पोटी कैफने मुंबईतील बँकांमधून काही रकमा काढून खातेदारांना त्यांच्या खात्यावर आलेल्या रकमेतून १० टक्के कमिशन देत होता, तसेच स्वतः ला १० टक्के कमिशन ठेवत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. सायबर पोलिसांनी कैफला अटक केली असून त्यांच्या संपर्कात असलेल्याचा शोध घेत आहे. (Cyber Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community