Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील निवडणुकांचा अन्वयार्थ

सामान्य जनतेने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिकवणुकीप्रमाणे सर्व हिंदु समाज एकसंध ठेवून आपला उत्कर्ष करायला मदत करणाऱ्या भाजपाप्रणीत महायुती बरोबर राहणे ही काळाची गरज आहे.

237

– प्रवीण दीक्षित

मे २०२४ मध्ये देशतील अन्य भागांप्रमाणे महाराष्ट्रातही लोकसभेच्या निवडणुका झाल्या व त्यात भाजपाप्रणीत एनडीएला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. त्यानंतर अवघ्या ६ महिन्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) झाल्या. त्यात मात्र भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला ५२ वर्षांनंतर २०० हून अधिक २३५ जागा जिंकता आल्या. अनेकांनी ह्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपाचे नेते व ह्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ह्यांनी जनमतापुढे आपण नतमस्तक असून हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, विकासाच्या अपेक्षेने केलेले आहे, असे विनम्रतेने म्हणून येणाऱ्या काळात ह्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करू असे उद्गार काढले.

ह्या उलट काँग्रेसच्या राहुल गांधीनी हे अनपेक्षित असून ह्या निकालाची चौकशी झाली पाहिजे, नाना पटोले ह्यांनी इव्हीएम बरोबर नसल्याचे सांगून आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ म्हणून सांगितले. तर कार्ती चिदंबरम् ह्यांनी सांगितले की, इव्हीएममध्ये काही घोटाळा असेल असे वाटत नाही. राष्ट्रवादी (शप) गटाचे शरद पवार ह्यांच्या मते वापरलेली इव्हीएम ही गुजरातमधून आल्याने घोटाळा झाला असावा असे म्हटले. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या मते हे असंभव असून ही लाट नसून त्सुनामी आहे. हे निकाल ठरवून घडवलेले आहेत व संजय राऊतांच्या मताप्रमाणे पुन्हा निवडणुक घेण्याची आवश्यकता आहे. मनसेच्या राज ठाकरे यांच्या मतेही हा इव्हीएमचा घोटाळा आहे. त्यांच्या विरारमधील हरलेल्या उमेदवाराच्या मते निवडणुक हे थोतांड आहे व ह्याची आवश्यकताच नाही. पण ही त्यांची हाकाटी व्यर्थ आहे कारण अद्याप कोणीही इव्हीएम कसे चुकीचे आहे हे दाखवून देऊ शकलेला नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही इव्हीएम विरोधी याचिका रद्द करून मत पत्रिका परत कधीही वापरल्या जाणार नाहीत हे अधोरेखित केले आहे. (Maharashtra Assembly Election)
वस्तुस्थिती अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे नेते व कार्यकर्ते गाफील राहिले व त्यामुळे बऱ्याच जागी त्यांचे थोडक्यात नुकसान झाले. मतांची टक्केवारी मात्र कायम होती व त्यामुळे, देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election) विजयाबद्दल ठाम होते. मागील चुकांपासून शिकून अर्थकारण व धर्मकारण ह्यांची त्यांनी सांगड घातली. समाजातील ज्या घटकांना आर्थिक सहाय्याची नितांत आवश्कता होती, अशा गरीबीने गांजलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना, बेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना, विविध सामाजिक घटकांसाठी जातीनिहाय महामंडळे, असे अनेक निर्णय घेतले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. शिवाय, उद्धव ठाकरे ह्यांनी आकसाने बंद पाडलेले अनेक विकासाचे प्रकल्प पूर्ण केले. ह्या उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक सामान्य लोकांना तुरुंगात डांबले, पालघर येथे साधूंची निर्घृण हत्या होऊनही त्यात विशेष लक्ष्य दिले नाही, लव्ह जिहाद घटनांकडे कानाडोळा केला, कलंकित पोलिस अधिकाऱ्यांना पुनर्वसित केले, शरद पवार पक्षातील गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना १०० कोटी आणून देण्यास सांगितले, राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बेछूट आरोप करून त्यांचा जाणूनबुजुन अपमान करीत होते, ह्या सर्व गोष्टी मतदारांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नव्हत्या. ह्याचा परिणाम होऊन अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय व उच्च वर्णीय गटांनी बहुमताने महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले आहे. परंतु मुसलमानांनी मात्र महायुतीच्या उमेदवारांना मत न देऊन स्वतःचे नुकसान करून घेतले आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते खोटेनाटे आरोप करीत होते की, भाजपा संविधान बदलणार आहे, आरक्षण समाप्त करणार आहे. प्रत्यक्षात, जातनिहाय गणना करून हिंदू समाज विघटन करायचे व तुष्टीकरणासाठी मुसलमानांना आरक्षण द्यायचे हा काँग्रेसचा डाव होता. महाराष्ट्रातील आर्थिक प्रगतीतून मिळणारा पैसा स्वार्थासाठी वापरायचा, भ्रष्टाचार करायचा, हे उद्दिष्ट होते. शिवसेना (शिंदे) उमेदवारांना पाडायचा राज ठाकरे ह्यांचा उद्देश होता व त्यासाठीच फक्त त्यांच्या विरुद्ध मनसेने उमेदवार उभे केले होते. शरद पवारांना आशा होती, की त्यांच्याशिवाय नवीन सरकार बनू शकणार नाही. परंतु मतदारांनी ‘एक है तो सेफ है’ व ‘बटेंगे तो कटेंगे’ ह्या घोषणातील अर्थ ओळखुन नकारार्थी प्रचार करणाऱ्या विरोधी पक्षांच्या सर्व महत्वाकांक्षी नेत्यांना घरी बसवले.
हरले तरीही हे नेते त्यांच्या सहकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाहीत. त्यांच्याकडून प्रोत्साहन घेणाऱ्या जरांगे पाटील सारख्या व्यक्ती पुन्हा जोमाने काम करायला लागतील. जॅार्ज सोरोसकडून निधी घेऊन शहरी नक्षलवादी विकासकामे बंद पाडायचे प्रयत्न करतील. ओवेसी व भाईबंद जातीय दंगली घडवायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिकवणुकीप्रमाणे सर्व हिंदु समाज एकसंध ठेवून आपला उत्कर्ष करायला मदत करणाऱ्या भाजपाप्रणीत महायुती बरोबर राहणे ही काळाची गरज आहे.
(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.