Eknath Shinde यांच्या कसोटीचा काळ सुरू!

120
सुजित महामुलकर

विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Elections 2024) राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले. २०१९ प्रमाणे ही विधानसभा निवडणूक भाजपा-शिवसेना युती (BJP-Shiv Sena alliance) म्हणून एकत्र लढले आणि बहुमतही मिळवले. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भर पडली आणि युतीची ताकद वाढली, हे मान्य. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे शिंदे यांची जबाबदारी आता वाढली आहे, हे मात्र नक्की. राज ठाकरे यांना २००९ मध्ये विधानसभा आणि त्यानंतर महापालिकेत आतापर्यंतच्या कारकीर्दीतील मोठे यश मिळाले पण ते पुढे टिकले नाही. शिंदे यांनी पक्षाची धुरा सांभाळली आणि लोकसभेनंतर विधानसभेत भरघोस यश प्राप्त केले, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, मात्र हे मिळवलेले यश टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान यापुढे त्यांच्यासमोर असेल. पक्ष प्रमुख म्हणून संघटना उभी करणे, मित्र पक्षांशी समन्वय साधणे आणि आपल्या आमदारांना सांभाळणे यात त्यांची कसोटी लागणार आहे. (Eknath Shinde)

पक्ष संघटना मजबूत करणे

शिंदे यांच्या या यशात भाजपाची साथ हा महत्त्वाचा भाग आहे. यात भाजपाचा स्वार्थ आहेच पण शिंदे यांचे हात बळकट करण्यास भाजपाची मदत होत आहे, यात शंका नाही. यापुढे पक्ष प्रमुख म्हणून शिंदे यांच्यावर आगामी महापालिका हे ध्येय डोळ्यापुढे असायला हवे. शिंदे यांनी पक्ष संघटना मजबूत करणे, आपले आमदार पक्षासोबत टिकवून ठेवणे आणि भाजपाशी समन्वय साधत जनतेची सेवा करत राहणे यावर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यातील राजकारणात आपले स्थान टिकवण्यास सोपे जाईल.

प्रसंगी नमते घेतले

२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर ठेवून शिवसेना-भाजपा युती विधानसभा निवडणूक लढली. बहुमत आले. तरीही गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ न पडता फडणवीस यांना विरोधी पक्ष नेता म्हणून काम करावे लागले. त्यानंतर अडीच वर्षांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी सामना करत-करत राज्यात पुन्हा २०२२ मध्ये भाजपा-शिवसेनेची सत्ता आणली, तेव्हाही सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी पक्षाचा आदेश पाळत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावली. त्या सबुरीचे आणि प्रसंगी अहंकार बाजूला ठेऊन, नमते घेण्याचे फळ त्यांना मिळाले.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule यांच्या ‘त्या’ विधनाने राजकीय क्षेत्रात खळबळ; नेमके काय म्हणाले…)

लोकप्रियतेच्या घोड्यावर स्वार

आता एकनाथ शिंदे यांच्यावर तीच वेळ आली आहे. प्रसंगी नमते घेत पक्ष संघटना वाढवणे. जनसंपर्क आहेच त्याची नाळ तुटू न देणे, हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ‘पक्ष कुणाचा’ या कायदेशीर लढाईत विजय मिळवता आला असला तरी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले स्थान जनतेच्या मनात पुढे कायम वरचढ ठेवण्याची नैतिक जबाबदारी शिंदे यांच्यावर असेल. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, संभाजी नगर यासह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रणनीती आखायला हवी. लोकप्रियतेच्या घोड्यावर स्वार झाल्यानंतर त्या घोड्यावर नियंत्रण ठेवणे शिंदे यांना शिकून घेणे भाग आहे. अन्यथा तो घोडा भरकटत जायला वेळ लागणार नाही.

युती हिंदुत्वाच्या पायावर उभी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा खरा वारसा आपण चालवतो, हे जनतेने शिंदे यांना स्वीकारून आणि उद्धव ठाकरे यांना नाकारून, एकप्रकारे मान्य केले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व आणि मराठी अस्मितेची विचारसरणी जनमानसात रुजली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उबाठाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केल्यानंतर आपली भूमिका धर्मनिरपेक्षतेच्या दिशेने वळवली. भाजपा आणि शिवसेना (Shivsena) ही नैसर्गिक युती हिंदुत्वाच्या पायावर उभी आहे. हा पाया खिळखिळा होऊ नये यासाठी हिंदुत्वाच्या अजेंड्याचा समतोल साधून पक्षाची ओळख आणि वैचारिक दिशा पुन्हा परिभाषित करण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे.

(हेही  वाचा – EVM ऐवजी बॅलेट पेपरचे समर्थन करणारा PM Modi यांचा व्हिडिओ निघाला खोटा)

मिठाचा खडा टाकणाऱ्यांपासून सावधान

यशाच्या शिखरावर असताना ‘खरे मित्र कोण’ आणि ‘चांगल्या नात्यात मिठाचा खडा टाकणारे कोण’ हे ओळखण्यात शिंदे यांची खरी कसोटी लागणार आहे. स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणे हा भाग आहेच, पण मुख्यमंत्री पद दिले नाही म्हणून भाजपाकडे राजकीय विरोधक म्हणून पाहणाऱ्या आपल्या समर्थकांपासून सावध राहून राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाशी जुळवून ‘एकमेका साह्य करू’ची भूमिका बजावली तर शिंदे यांना पुढील किमान १५ वर्षे राजकारणात स्थिरता येण्यास मदत होऊ शकेल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.