घरात येणाऱ्या पैशांच्या बंडल प्रकरणी मला माझ्या सासू आणि नणंदेकडून कळले की हे सर्व पैसे प्रदीप शर्मा यांचे आहेत, असे अंधेरी येथे राहणाऱ्या गुंजन सिंह हीने सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गुंजन सिंह ही प्रदीप शर्मा यांचे परिचित अनिल सिंह याची पत्नी असून, प्रदीप शर्माला अटक होताच त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक जण पुढे आले त्यापैकी गुंजन सिंह ही एक महिला समोर आली आहे.
सीआयडी करत आहे चौकशी
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक होताच केतन तन्ना, सोनू जालान हे क्रिकेट बुकी शर्मा यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे आले. प्रदीप शर्मा आणि ठाण्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात या दोघांनी पोलिस महासंचालक, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी)कडे देण्यात आलेले आहे.
(हेही वाचाः बार मालकांकडून वसूल केलेले ४.७० कोटी अनिल देशमुखांना दिले! वाझेची कबुली)
कोण आहे अनिल सिंह
या प्रकरणात सीआयडीने तक्रार अर्जासंबंधित व्यक्तीचे जबाब घेण्यास सुरूवात केली असून, सोमवारी याप्रकरणी अंधेरी येथे राहणा-या गुंजन सिंह या महिलेचा सीआयडीने जबाब नोंदवून घेतला. तिने प्रदीप शर्मा यांच्यावर आरोप करुन माझे पती अनिल सिंह हे प्रदीप शर्मा आणि परमबीर सिंग यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते, असा आरोप केला होता.
काय आहेत आरोप?
सोमवारी गुंजन सिंह हिने सीआयडीला दिलेल्या जबाबात ‘माझे पती अनिल सिंह हे प्रदीप शर्माचे मित्र आहेत, त्यांचे आर्थिक व्यवहार माझे पती बघायचे, घरी येताना माझे पती काळ्या रंगाच्या गारबेज बॅगमधून पैशांचे बंडल घेऊन यायचे आणि ते पैशांचे बंडल एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे असायचे, असे मला माझ्या सासूकडून कळले. तसेच अनेक वेळा माझ्या पतीने फोनवर बोलताना परमबीर सिंग हे नाव देखील घेतले असल्याचे मी ऐकले होते, असे गुंजन सिंह हिने सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
(हेही वाचाः प्रदीप शर्मासह संतोष शेलार, आनंद जाधवला न्यायालयीन कोठडी)
Join Our WhatsApp Community