जहाल महिला नक्षलवाद्याचे Gadchiroli मध्ये आत्मसमर्पण

59
जहाल महिला नक्षलवाद्याचे Gadchiroli मध्ये आत्मसमर्पण
जहाल महिला नक्षलवाद्याचे Gadchiroli मध्ये आत्मसमर्पण

नक्षल सप्ताह दरम्यान जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली (Gadchiroli) पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. या महिला नक्षलवाद्यावर (Naxalites) शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे (वय 28 वर्षे, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली) असं या महिला नक्षलवाद्याचे नाव आहे. तिने आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलवाद्याने आतापर्यंत तीन खून केल्याची नोंद आहे. तिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.

(हेही वाचा – केंद्र सरकारने घेतला Windfall Tax रद्द करण्याचा निर्णय; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती)

शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणले आहे. त्यामुळेच आतापर्यंत एकूण 679 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे हिने सन 2016 मध्ये अहेरी दलममध्ये (Aheri Dalam) सदस्य पदावर भरती होऊन सन 2018 पर्यंत कार्यरत होती. सन 2018 पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती. दलममध्ये असतांना तिच्यावर चकमकीचे ८ गुन्हे, खुनाचे ३ गुन्हे, तर इतर १ गु्न्हा दाखल आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन गडचिरोली (Gadchiroli) पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.