-
ऋजुता लुकतुके
यंदाच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीची चुरस सध्या खूप वाढलेली आहे. आणि कधी नव्हे इतकी रंगतदार परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका, दक्षिण आफ्रिकेच्या श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिका, श्रीलंका – न्यूझीलंड मालिका असे सगळेच निकाल हे कसोटी अजिंक्यपद (ICC Test Championship) स्पर्धेची उत्कंठा वाढवणारे ठरणार आहेत.
जूनमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वी एकूण १५ कसोटी बाकी आहेत. या कसोटीतील प्रत्येक निकाल हा इतर देशांची धाकधूक वाढवणारा ठरेल. अशा वेळी भारतीय संघाला उर्वरित ४ कसोटींमधून अंतिम फेरीचं गणित नेमकं कसं साध्य करता येईल, ते पाहूया. आधी सध्याची आकडेवारी बघूया,
(हेही वाचा – उत्तर प्रदेशचे CM Yogi Adityanath २२ डिसेंबरला अमरावती दौऱ्यावर)
भारतीय संघासाठी बोर्डर – गावसकर मालिकेचा (Border – Gavaskar series) निर्णय काय होतो यावर पुढे चाल अवलंबून आहे. मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवाने भारतीय संघाला कोंडीत पकडलं आहे. पण, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या निकालाच्या शक्यता लक्षात घेऊन भारताची पुढील वाटचाल कशी असू शकेल, याचा घेतलेला हा आढावा आहे.
पहिली शक्यता – भारताने बोर्डर – गावसकर मालिका ५-०, ४-०, ३-० अशी जिंकली
भारतीय संघाने ही मालिका निर्विवाद वर्चस्वासह जिंकली, तर कसोटी अजिंक्यपद (ICC Test Championship) स्पर्धेतील भारताचा प्रवेश सुनिश्चित होईल. अशा परिस्थितीत भारताला इतर मालिकांच्या निकालांवर अवलंबून राहायला नको. पण, निकाल एकतर्फी भारताच्या बाजूने लागला तर ऑस्ट्रेलियाचं अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान मग संपुष्टात येईल. ते सध्याचे विजेते आहेत.
(हेही वाचा – Border Gavaskar Trophy, Adelaide Test : सरावादरम्यान रोहित शर्मा शुभमन गिलला मारतो आणि…)
दुसरी शक्यता – भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने पराभव केला
५ कसोटींच्या या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला, तरीही भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद (ICC Test Championship) स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकतो. पण, त्यासाठी आफ्रिकन संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवता कामा नये. आफ्रिका आणि श्रीलंकेदरम्यानची कसोटी अनिर्णित जरी राहिली, तरी भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकतो. अशावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अंतिम फेरीत समोरासमोर येण्याची शक्यता वाढते.
तिसरी शक्यता – भारताची ऑस्ट्रेलियावर ३-२ ने मात
भारताने ३-२ ने विजय मिळवला तर अजिंक्यपद स्पर्धेचं गणित सगळ्यांसाठीच अवघड होऊन बसेल. कारण, भारतासाठी ही शेवटची मालिका असली तरी ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेबरोबर कसोटी मलिका खेळणार आहे. आणि या मालिकेत मग श्रीलंकेला किमान बरोबरी मिळवावी लागेल. एक जमेची बाजू म्हणजे जानेवारी महिन्यात होणारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ही कसोटी मालिका गॉल इथं होणार आहे. या मैदानावर श्रीलंकेचा संघ अजेय आहे. त्यामुळे निकाल कदाचित त्यांच्या बाजूने लागूही शकतो. अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठतील.
(हेही वाचा – YS Jagan Mohan Reddy यांच्या अडचणी वाढणार; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय करणार तपास)
चौथी शक्यता – भारत – ऑस्ट्रेलिया मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली
बोर्डर – गावसकर मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर भारताच्या अंतिम फेरी गाठण्याच्या शक्यता काहीशा कमी होतात. पण, तरीही गणिताच्या जोरावर एक आशा आहेच. दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेला २-० ने हरवलं आणि त्यानंतर लंकन संघाने ऑस्ट्रेलियाला १-० ने हरवलं तर कदाचित भारतीय संघाला अंतिम फेरीची आशा असू शकते.
पाचवी शक्यता – भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका २-३ ने गमावली
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-३ असा पराभव झाला तरीही भारताला अंधुकशी आशा बाळगता येईल. पण, त्यासाठी गणित थोडं किचकट झालेलं असेल. भारताला इतर मालिकांमधील प्रत्येक निकालावर लक्ष द्यावं लागेल. इतर मालिकांमधील निकाल कसे लागले पाहिजेत ते बघूया,
न्यूझीलंड आणि इंग्लंड दरम्यानची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटावी लागेल
दक्षिण आफ्रिकेला आधी श्रीलंका आणि मग पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधावी लागेल
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटावी लागेल (गॉल या फिरकीला साथ देणाऱ्या ठिकाणी हे जवळ जवळ अशक्य आहे)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community