MVA फुटणार; कॉंग्रेस-‘उबाठा’तील मतभेद चव्हाट्यावर!

119
MVA फुटणार; कॉंग्रेस-‘उबाठा’तील मतभेद चव्हाट्यावर!
  • खास प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) पुरता बोजवारा उडाल्यानंतर शनिवारी ७ डिसेंबर २०२४ या दिवशी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातील पहिल्या दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठा यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. महाविकास आघाडीतही फूट पडल्याचे दिसून आले तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे कुणासोबत जायचे हा प्रश्न पडला आहे.

कॉंग्रेसचा बहिष्कार

राज्यातील २८८ आमदारांच्या शपथविधीसाठी ७-९ डिसेंबर २०२४ असे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी २८८ पैकी १७३ आमदारांनी शपथ घेतली. सभागृहात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू झाला तेव्हा कॉंग्रेसचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता. पण शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी (शप) आमदार रोहित पवार आणि काही अन्य आमदार उपस्थित होते.

(हेही वाचा – मी केवळ हिंदू मतांवर निवडून आलोय; Nitesh Rane यांचा संजय राऊतांना हल्लाबोल)

सभागृहातून गुपचूप बाहेर

काही आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी (शप) आमदार सभागृहात कोणताही निषेध न नोंदवता सभागृहातून गुपचूप बाहेर पडले. ते बाहेर गेल्यानंतरही ‘मविआ’चे घटक पक्ष असलेले समाजवादी पक्षाचे दोन आमदार अबू आझमी आणि रईस शेख तसेच कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) विनोद निकोले हे सभागृहातच थांबले. तसेच त्यांनी आमदारकीची शपथही घेतली आणि ‘मविआ’मधून बाहेर पडल्याचे संकेत दिले.

‘मविआ’च्या बैठकीत वाद

महाविकास आघाडीचे (MVA) नेतृत्व करीत असलेल्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळीच ‘मविआ’ने शपथविधीवर बहिष्कार टाकला असल्याचा संदेश फक्त कॉंग्रेसच्या आमदारांना पाठवला. त्यामुळे कॉंग्रेसचा एकही आमदार सभागृहात नव्हता. मात्र हा संदेश ऊबाठा आणि राष्ट्रवादीला (शप) पाठवण्यात आला नाही. यामुळे उबाठा आमदारांनी ‘मविआ’च्या बैठकीत वाद घालत कॉंग्रेस उबाठा ‘मविआ’तून बाहेर पडणार असल्याचा इशारा दिला.

(हेही वाचा – MLA Oath Ceremony : काही हिंदी तर एक सिंधी, पण विधानसभेत डंका मराठी-संस्कृतचाच)

हिंदुत्वाची भूमिका

विधानसभेत पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे मोर्चा वळवला असल्याने महाविकास आघाडीतील (MVA) सपाची नाराजी ओढवून घेतली आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तर ‘मविआ’त आपण राहणार नाही, अशी भूमिका घेतली.

सपा बाहेर, आव्हाडांची पंचाईत

दरम्यान राष्ट्रवादी (शप) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची पंचाईत झाली असून उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली तर सपा नाराज होते आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरण्याचे आदेश ऊबाठाच्या माजी नगरसेवकांना दिल्याने आव्हाड यांची ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी अवस्था झाली आहे. माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की आझमी यांची समजूत काढली जाईल. त्यामुळे शरद पवार यांनी आव्हाड यांच्यावर गटनेते पदाची जबाबदारी का दिली, हे लक्षात येते, अशी चर्चा विधानभवन परिसरात होत होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.