- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर पश्चिम येथील केशवसूत उड्डाणपूलाखालील विविध संस्थांना दिलेले गाळे काढून घेत त्यातील बांधकाम तोडून परिसर मोकळा करण्यात आला. परंतु गाळे मोकळे केल्यानंतर त्या ठिकाणच्या भागांचे सुशोभीकरण करण्याऐवजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत त्यातील जागा फेरीवाल्यांनाच व्यवसाय करण्यास आंदण देऊन टाकले आहे. मात्र, ज्या कारणासाठी पुलाखाली गाळ्यांचे बांधकाम तोडण्यात आले होते, त्याच कारणाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत या पुलाखालील गाळा क्रमांक १५ मध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलाखाली करण्यात आलेले हे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम वादात अडकण्याची दाट शक्यता आहे. (BMC)
दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील कविवर्य केशवसूत उड्डाणपुलाखाली गाळा क्रमांक १५ अर्थात पणशीकर स्वीट्सच्यासमोरील भागात शिव स्नेहन सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने नव्याने सुलभ शौचालय आणि रात्र दिवस निवारा केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या गाळ्याच्या एका बाजूला सुलभ शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असून दुसऱ्या बाजूला रात्र निवाराची सुविधा आहे. परंतु याच गाळ्याच्या शेजारील गाळ्यात यापूर्वीच सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे आधीच येथील बाजूच्या गाळ्यात सार्वजनिक शौचालयाची सुविधा असताना त्याच्या शेजारील गाळ्यात आणखी सुलभ शौचालय बांधण्यात आल्याने महापालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे दर्शन घडले आहे. याला मनसेच्यावतीने आक्षेप घेण्यात आला आहे. (BMC)
(हेही वाचा – बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ले त्वरित थांबवा; अमेरिकेतील राजकीय नेते Raja Krishnamoorthi यांची मागणी)
मनसेच्या रस्ते, साधन सुविधा आणि आस्थापना विभागाचे जी उत्तरचे प्रभाग संघटक साईनाथ झोटिंग यांनी २ डिसेंबर २०२४ रोजी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना निवेदन देत या सुलभ शौचालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केशवसूत उड्डाणपुलाखाली गाळा क्रमांक १० व १४ मध्ये सुलभ शौचालय असतानाही शेजारील गाळा क्रमांक १५ मध्ये कोणाचीही मागणी नसतानाही स्थानिकांचा विरोध होता. तरीही शिव स्नेह प्रतिष्ठान संस्थेला परवानगी देण्यात आली. जी उत्तर विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी सर्व नियम डावूलन या संस्थेला परवानगी दिली आहे. तरी या शौचालयाची जागा तातडीने खाली करण्यात यावी असे म्हटले आहे. (BMC)
हे सार्वजनिक शौचालय केशवसूत उड्डाणपूलाखाली आहे. पण पूल विभागाच्या धोरणानुसार तसेच स्टॅक कमिटीच्या शिफारशीनुसार पुलाची उंची साडेपाच मीटरपेक्षा कमी असल्यास त्याठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी नाही. परंतु केशवसूत उड्डाणपुलाची उंची ३ मीटरपेक्षा कमी आहे. तसेच पूल विभागाच्या धोरणानुसार पुलाखाली बांधकाम करताना संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. परंतु याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली असता शिव स्नेह सामाजिक प्रतिष्ठान संस्थेबाबत कोणतीही माहिती संबंधित कार्यालयात उपलब्ध नाही असे उत्तर आपल्याला दिल्याचे साईनाथ झोटिंग यांनी म्हटले आहे. याबाबत माहिती अधिकारात मला दिलेल्या माहितीमध्ये जी उत्तर विभागाने सन २०१४ मध्ये केशवसूत उड्डाणपुलाखालील सर्व गाळे हे स्टॅक कमिटीच्या अहवालानुसार व तत्कालिन महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार रिकमी करण्यात आलेले असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे जर या पुलाखाली बांधकाम करता येत नसल्याने जर पूर्वी येथील बांधकामे तोडली होती, तर पुन्हा याच गाळ्यांमध्ये पक्के बांधकाम करण्यास महापालिकेने परवानगी कशी दिली असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे या गाळ्यातील शौचालयाचे बांधकाम तोडून त्या जागेचे सौदर्यीकरण करावे आणि येथील सर्वच गाळ्यांचे परिसर फेरीवालामुक्त करून मोकळे केले जावे आणि रेल्वे प्रवाशी आणि स्थानिकांना चालण्यास मोकळी वाट करून दिली जावी अशी विनंती केली आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community