गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना लालपरी ही कायमंच हक्काची वाटते. दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी एसटीने कोकणात जात असतात. त्यांच्यासाठी दरवर्षी गणशोत्सवात एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात येतात. त्याचप्रमाणे या वर्षीही एसटी महामंडळाने कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी 2200 ज्यादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर बस सेवा
कोकणातील चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवासाठी, एसटी महामंडळाने 2200 ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बस स्थानकांतून 4 सप्टेंबरपासून या बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान या बस सेवा सुरू राहणार आहेत, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार…
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/LOejFSNoL0— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) July 14, 2021
(हेही वाचाः गरज सरो, एसटी मरो!)
16 जुलैपासून बुकिंग सुरू
14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार असून, 16 जुलैपासून त्यांच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे परतीच्या प्रवासाचे बुकिंग सुद्धा प्रवाशांना एकाचवेळी करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बस निर्जंतुक केल्या जाणार असून, सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक असणार आहे.
रेल्वेही चालवणार 72 विशेष गाड्या
गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने 72 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल, या गाडीच्या एकूण 36 ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल, या गाडीच्या 10 ट्रीप होणार आहेत. पनवेल-सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल, या गाडीच्या एकूण 10 ट्रीप होणार आहेत, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
(हेही वाचाः गणपतीक गावाक जावचा हा? तर ही बातमी वाचा…)
Join Our WhatsApp Community