मुख्यमंत्र्यांचाच लोकल सुरु करण्याला विरोध?

238

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले असतानाच लोकल सुरु करण्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये अजूनही मतभेद असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच लोकल सुरु करण्याला विरोध असल्याची माहिती सूत्रांनी हिंदुस्थान पोस्टला दिली आहे. राज्यात अनलॉकची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली असली तरी देखील अजूनही लोकल सुरु करण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सुरु करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र व्यवहार करावा असे मुख्यमंत्र्यांना सूचवले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने महाविकास आघाडीमध्ये लोकल सुरु करण्यावरून दोन गट झाल्याचे कळतेय.

म्हणून लोकल सुरु करण्याला मुख्यंमंत्र्यांचा विरोध

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा राज्य सरकारची डोकेदुखी ठरली होती. मात्र आता मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. तसेच मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये देखील कोरोना आटोक्यात आला आहे.  मात्र लोकल सुरू झाली तर मुंबईमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लोकल सुरू करण्याला विरोध असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार

राज्यातील अर्थचक्र गतीमान करायचे असेल तर मुंबई पूर्वपदावर येणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकल ट्रेन सुरु झालीच पाहिजे. यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली होती.  याशिवाय, आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेसही सुरु होण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी वर्तविली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.