CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्ली दौरा; महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. गृहमंत्री शाह यांच्यासोबतच्या आजच्या भेटीनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 डिसेंबरला होणे जवळपास निश्चित आहे.

85
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही बुधवारी, ११ डिसेंबर रोजी रात्री गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये महायुती सरकारच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दोघांच्या सोबत दिल्लीला न आल्यामुळे राजधानीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची रचना निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत आले होते. दोन्ही नेते रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या मार्गातील अडचणींवर तोडगा काढणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) पहिल्यांदाच दिल्लीत आले होते. राजधानीत दाखल होताच त्यांनी भेटीगाठीला सुरुवात केली.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुधवारी सायंकाळी राजधानीत दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या रकाबगंज रोडवरील निवासस्थानी त्यांनी नेत्यांशी चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे किती मंत्री असतील आणि कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय दिले जाईल, यावर अंतिम चर्चा होणार आहे.

अजित पवारांचा प्लान बी तयार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिवसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आला आहे. गृहखात्याचा तिढा सुध्दा सुटला आहे. या कारणामुळे शिंदे आले नाही. अजित पवार भेटीसाठी आलेत कारण त्यांना प्लान ‘बी’च्या मुद्यावर चर्चा करायची होती, असे सूत्राचे म्हणणे आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. गृहमंत्री शाह यांच्यासोबतच्या आजच्या भेटीनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 डिसेंबरला होणे जवळपास निश्चित आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे थेट उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.