मुंबई प्रतिनिधी
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बस (Best bus) अपघातानंतर कुर्ला स्थानक पश्चिम ते कुर्ला आगारादरम्यान बेस्ट बस सेवा बंदचा आजचा चौथा दिवस आहे. बेस्ट सेवा बंदच्या प्रकरणी पोलीस आणि बेस्ट प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे बेस्ट बस सेवा बंद करण्याचा निर्णय नक्की कुणाचा आहे, यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचा नाहक फटका प्रवाशांना बसत असून वयोवृद्धाना सर्वांत जास्त त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे.
(हेही वाचा – RBI Mumbai Bomb Threat : थेट आरबीआय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेतील मेलची चौकशी सुरू)
कुर्ला पश्चिम एस.जी. बर्वे मार्ग या ठिकाणी सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतर बेस्टने कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार दरम्यान बेस्ट सेवा बंद केली आहे. वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, साकिनाका इत्यादी मार्गावर धावणाऱ्या बेस्ट बसेस या गेल्या ४ दिवसांपासून कुर्ला (kurla) आगार आणि सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोड (Santacruz-Chembur Link Road) येथून सोडण्यात येत आहे. या मार्गावर बेस्ट बस बंद करण्यात आल्याचा आजचा (शुक्रवार, १३ डिसेंबर) चौथा दिवस आहे. मात्र बेस्ट प्रशासनाकडून कुर्ला स्थानकातून बेस्ट बस केव्हा सोडल्या जातील, याबाबत कुठलीही सूचना अद्याप देण्यात आलेली नाही. कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार हे अंतर जवळजवळ दीड किलोमीटर एवढे आहे, बस पकडण्यासाठी प्रवाशांना कुर्ला आगारापर्यंत पायपीट करावी लागत असून रिक्षा चालक या अंतरापर्यंत जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. कुर्ला पश्चिम येथून नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्यामुळे त्यांना गेल्या चार दिवसांपासून कामावर लेटमार्क पडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वयोवृद्ध नागरिकांना सर्वांत जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा कधी सुरू करण्यात येणार आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी हिंदुस्थान पोस्टने बेस्टचे जनसंपर्क अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेस्ट बस मार्ग बंद करण्यात आल्याचे खापर पोलिसांवर फोडले आहे. “कुर्ला स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आम्ही बंद केलेल्या नसून पोलिसांनी आम्हाला कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार या मार्गावरील बेस्ट बसेस बंद करण्यास सांगितले आहे. या मार्गावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या मार्गावरील परिस्थिती नियंत्रण येईपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश आहेत. पोलिसांकडून आम्हाला बस सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर आम्ही तात्काळ या मार्गावर बेस्ट बसेस सुरू करू”, असे बेस्टने जनसंपर्क अधिकारी सावंत यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.
दरम्यान हिंदुस्थान पोस्टने परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता “आम्ही या मार्गावर बेस्ट बंद करण्याचे कुठलेही लेखी किंवा तोंडी आदेश दिलेले नाही. मी स्वतः याबाबत कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे चौकशी केली, त्यांनी देखील असे आदेश बेस्टला दिलेले नाहीत. उलट आम्ही त्यांना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तुमची मोमेंट सुरू करू शकता, असे आम्ही त्यांना कळवले होते, असे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. बेस्ट आणि पोलीस यांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचा नाहक फटका प्रवाशांना मागील चार दिवसांपासून बसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community