Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीचे महत्त्व, दत्त जन्माचा इतिहास जाणून घ्या

261
Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीचे महत्त्व, दत्त जन्माचा इतिहास जाणून घ्या

प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात दत्त जयंतीचे महत्त्व तसेच या निमित्ताने दत्त जन्माचा इतिहास, दत्ताचा परिवार आणि त्याचा भावार्थ, दत्ताचे अवतार, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्त उपासनेचे महत्त्व याविषयी समजून घेऊया. (Datta Jayanti 2024)

(हेही वाचा – Kurla Bus Accident : बेस्ट बस बंदचा चौथा दिवस; पोलीस आणि बेस्ट प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचा फटका प्रवाशांना)

जन्माचा इतिहास

१. पुराणांनुसार : अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. ‘आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. (Datta Jayanti 2024)

२. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात.

जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत : दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.

दत्तयाग : दत्त जयंतीच्या निमित्ताने काही ठिकाणी दत्तयागाचे आयोजन करण्यात येते. असंख्य भक्तगण दत्तजयंती निमित्त गुरुचरित्राचे पारायण करतात. दत्तयाग यामध्ये पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. दत्तयागासाठी केल्या जाणार्‍या जपाची संख्या निश्चित नाही. स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.

(हेही वाचा – Tata Motors कडून बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे आपल्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे अनावरण)

दत्त जयंती अशी साजरी करा !
  • दत्ताचा नामजप आणि प्रार्थना अधिकाधिक करा.
  • दत्ताची भावपूर्ण पूजा आणि आरती करा.
  • दत्त स्तोत्राचे पठण करा.
  • दत्त तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या काढा.
  • घरात दत्ताची सात्त्विक नामजप पट्टी लावा.
दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !
  • स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.
  • विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीदत्तात्रेयकवच’ पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा.
  • उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.
  • दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

(हेही वाचा – Allu Arjun Arrested : ‘पुष्पा 2’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक !)

दत्ताचा परिवार आणि त्याचा भावार्थ

वृक्ष, गाय, श्वान : दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. गाय आणि कुत्रे ही एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात.

झोळी : दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे – झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. (Datta Jayanti 2024)

कमंडलू : कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे; कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय.

त्रिशूळ : त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही.

दत्ताचे २४ गुण-गुरु : दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.

(हेही वाचा – दिल्ली दौऱ्यात CM Fadnavis यांनी वीर सावरकरांसह ‘या’ मूर्ती देऊन मान्यवरांच्या घेतल्या भेटीगाठी)

दत्ताचे अवतार

१. दत्ताचे प्रमुख अवतार

श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिकप्रभु, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री भालचंद्र महाराज

श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार. यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना सुरू केली. श्री नृसिंह सरस्वती हा दत्ताचा दुसरा अवतार. श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांची विस्तृत माहिती आहे.

२. दत्तात्रेयांचे १६ अंशअंशात्मक अवतार : योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीलाविश्‍वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्‍वंभर, मायामुक्त, श्रीमायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्यामकमलनयन, हे दत्तात्रेयांचे १६ अवतार अंशअंशात्मक होते.- (संदर्भ : भक्तीकोष)

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करा : हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात. दत्त पूर्वजांना गती देतो आणि त्यांचा उद्धार करतो. त्यामुळे दत्ताच्या उपासनेमुळे व्यक्तीला होणारा पूर्वजांचा त्रास न्यून होतो. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप त्रासाचा तीव्रतेनुसार प्रतिदिन १ ते ६ तास करावा. (Datta Jayanti 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.