‘मविआ’ची शकले; Sanjay Raut यांची कबुली, वडेट्टीवार म्हणाले राऊतांना फ्रस्ट्रेशन

80
'मविआ'ची शकले; Sanjay Raut यांची कबुली, वडेट्टीवार म्हणाले राऊतांना फ्रस्ट्रेशन
  • खास प्रतिनिधी 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते महानगरपालिका निवडणुकांचे. मुंबईसह पुणे, नागपूर आणि अन्य महापालिका, नगरपालिका निवडणुका येत्या वर्षभरात होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका शिवसेना उबाठा स्वतंत्रपणे लढल्या पाहिजे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी १३ डिसेंबर २०२४ या दिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर खापर फोडणाऱ्या महाविकास आघाडीची शकले झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर संजय राऊत यांना फ्रस्ट्रेशन आल्याचं दिसतं आहे, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

या वेगळ्या निवडणुका

महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकात्रपणे लढणार का? असा प्रश्न केला असता राऊत (Sanjay Raut) उखडले. ते म्हणाले, “तुमचा हट्ट का आहे त्यासाठी. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या युती किंवा आघाडीत लढल्या गेल्या नाहीत. बीजेपी-शिवसेना युती असताना नाही किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असतानाही नाही. या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात,” असे राऊत यांनी सांगितले.

(हेही वाचा – राज्यपालनियुक्त आमदारांमध्ये Mahant Aniket Shastri यांचा समावेश करण्याची वेदाचार्यांची मागणी)

स्वतंत्रपणे लढलं पाहिजे

राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले, “महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचयाती या निवडणुका वेगळ्या आहेत. ज्याना स्वतंत्रपणे लढायच्या आहेत त्यांनी स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, हेच बळ पुढे लोकसभा आणि विधानसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी २०१७ चा अपवाद वगळता गेल्या २५ वर्षात शिवसेनेने भाजपासोबत युती करून मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवल्या असल्याचे राऊत (Sanjay Raut) विसरले, असा प्रश्न केला जात आहे.

राऊतांना फ्रस्ट्रेशन आलेलं दिसतं

यावर काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मला संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वागण्यातून देहबोलीतून त्यांना थोडं फ्रस्ट्रेशन आल्यासारखं दिसतं आहे. आणि कदाचित नैराश्येपोटी हा ‘एकला चलो रे’चा नारा दिला असेल. त्यांचा पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे लढायचा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे लढण्यासाठी तयार आहोत. परंतु संजय राऊत यांच्या भूमिकेसंदर्भात स्पष्टता आली की आम्ही आमचा निर्णय घेऊ,” असे वडेट्टीवार यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.