महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस आणि मंत्रीमंडळ विस्तारासाठी आणखी १० असे मिळून एकूण २२ दिवस लागले. ५ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी (Cabinet Expansion) आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये २० नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक माजी मंत्र्यांना, महायुतीमधील मोठ्या नेत्यांना या वेळी संधी देण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील अनेक इच्छुकांना मंत्रीमंडळामध्ये संधी देण्यात आलेली नाही. शिवसेनेची मंत्रीपदे अडीच वर्षांसाठी देण्यात आलेली आहेत. याविषयी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – Cabinet Expansion : मोठ्या नेत्यांना मंत्रीमंडळात संधी का नाही ?; देवेंद्र फडणवीस म्हणाले….)
तुमची कामगिरी चांगली नसेल, तर…
शपथविधीनंतर शिरसाट म्हणाले, गेल्या ४० वर्षांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून आज मंत्रीपद मिळाले आहे. मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. परंतु, माझे काम आजवर मतदारसंघापुरते मर्यादित होते. मात्र आता संपूर्ण राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मी गमावणार नाही. एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, सध्या तरी मंत्रीपदे अडीच वर्षांसाठीच आहेत. तुमची कामगिरी चांगली नसेल, तर तुम्हाला अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्रीपदावरून डच्चू दिला जाऊ शकतो. जो चांगलं काम करेल, तो मंत्रीपदी कायम राहील. जो चांगलं काम करणार नाही, त्याला डच्चू दिला जाऊ शकतो आणि इतरांना संधी दिली जाईल. हा एकनाथ शिंदे यांचा चांगला फॉर्म्युला आहे.
शिंदेंव्यतिरिक्त शिवसेनेतील ११ आमदारांना मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे इतर काही इच्छुक आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उपाय देखील शोधला आहे. इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मंत्रिपदे वाटून देण्याची योजना आखली आहे. त्यांनी मंत्र्यांकडून अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी प्रतिज्ञापत्रही लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची (Cabinet Expansion) शपथ घेतली असून यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर व संजय शिरसाट यांचा समावेश आहे. तर, रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल व योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपध घेतली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी १० दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community