WPL Auction : १६ व्या वर्षी करोडपती झालेली कमलिनी कोण आहे?

WPL Auction : १६ वर्षांच्या कमलिनीने लिलावात सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

87
WPL Auction : १६ व्या वर्षी करोडपती झालेली कमलिनी कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरूत नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्यूपीएलच्या लिलावात सर्वाधिक बोली लागली ती सिमरन शेखवर १.९ कोटी रुपये इतकी. पण, १६ वर्षीय कमलिनीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने तिच्यासाठी १.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे इतक्या कमी वयात ती करोडपती झाली आहे. असं या मुलीत आहे काय अशी चर्चा भारतीय क्रिकेट जगतात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे १० लाख रुपये इतकी कमी आधारभूत किंमत असताना कमलिनीने कोटीची उड्डाणं घेतली आहेत. (WPL Auction)

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघांनी शेवटपर्यंत तिच्यावर बोली लावली आणि यात तिची किंमत चढत गेली. १९ वर्षांखालील आशिया चषक आणि भारताच्या युवा संघात बजावलेल्या कामगिरीमुळे कमलिनीची चर्चा आहे आणि त्यामुळे फ्रँचाईजींना तिच्यात रस आहे. देशांतर्गत युवा क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूला विजेतेपद मिळवून देताना कमलिनीने ८ सामन्यांत ३११ धावा केल्या आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेत तिने १० षटकारांची आतषबाजी केली आहे. (WPL Auction)

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा मालिकेत भारतीय ब संघाकडून खेळताना ७९ धावा करून तिने निवड समितीचंही लक्ष आपल्याकडे वेधलं आणि त्यामुळे १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात तिची निवड झाली. तिथेही पाकिस्तानविरुद्ध कमलिनीने २९ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली आहे. इतकंच नाही तर कमलिनी अष्टपैलू आहे. (WPL Auction)

फटकेबाज फलंदाज अशी तिची ओळख असली तरी ती यष्टीरक्षण करू शकते आणि डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणूनही तिचा वापर होऊ शकतो आणि सगळ्या स्तरांतील क्रिकेटमध्ये तिने आपली तीनही प्रकारची उपयुक्तता सिद्ध केली आहे. सध्या भारताच्या युवा संघाचा भाग असली तरी वरिष्ठ गटात देशांतर्गत स्पर्धा ती या पूर्वीच खेळली आहे आणि सध्या सुपर किंग्जच्या चेन्नई इथं असलेल्या अकादमीत ती सराव करते आहे. (WPL Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.