पावसाळी अधिवेशन हे विधानसभा अध्यक्षांविना पार पडल्यानंतर, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक नेमकी कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. असे असतानाच विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. हिंदुस्थान पोस्टच्या ‘ऑफबीट निलमताई’ या विशेष मुलाखतीत नीलमताईंनी विविध विषयांवर भाष्य केले.
त्यांना विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत विचारले असता, त्यांनी जास्त न बोलता विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होईल, असे सांगितले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात अध्यक्ष बिनविरोध निवडून येण्याची पंरपरा आहे त्यामुळे ही नुसती चर्चा तरी कशाला, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
(हेही वाचाः रश्मी ठाकरे होऊ शकतात मुख्यमंत्री…)
नेमकं काय म्हणाल्या ताई?
२०१४ रोजी बहुमताने अध्यक्षपदी हरीभाऊ बागडेंना जाहीर केले. त्यावेळी एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षनेता केले आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री बनले होते, एका पक्षाचा त्यावेळी बहिष्कार होता. एका पक्षाचे मत मोजले नाही. त्यामुळे कुठल्याही कायद्यात बदल न करता नियमाने आयत्या वेळेला अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. अध्यक्ष जे होतील ते महाविकास आघाडीचे होतील. महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आणायची पंरपरा आहे त्यामुळे विनाकारण चर्चा कशाला करायच्या असे नीलम ताई म्हणाल्या.
आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड?
विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी महाविकास आघाडीत हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपद सध्या महाराष्ट्रात रिक्त आहे. अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राज्य विधिमंडळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने होते. मात्र ही निवडणूक आवाजी मतदानाने घेण्यासाठी विधिमंडळ कायदे नियमांमध्ये बदल करण्याबाबत हालचाली सुरु झाल्यात आहेत.
(हेही वाचाः हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला नीलम ताईंचे चोख प्रत्त्युत्तर)
विधिमंडळ नियम समितीसमोर प्रस्ताव
असा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला असून, तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप पक्षाचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. काही दिवसांआधी या संदर्भात कायदे मंडळ समितीची एक बैठक झाली. या समितीत भाजपच्या दोन सदस्यांपैकी एक सदस्य निलंबित असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरे आमदार जयकुमार गोरे हे या बैठकीला अनुपस्थित होते.
दगाफटका होण्याची भीती
विधिमंडळ कायदे समितीची बैठक नुकतीच झाली असून, अधिवेशन कालावधीमध्ये यासंदर्भात प्रस्ताव आणून तो मंजूर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या नियमावलीनुसार जर विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घ्यायचे ठरले, तर गोपनीय मतदान करावे असा नियम आहे. पण गोपनीय मतदानामध्ये दगाफटका होऊ शकतो, हे लक्षात घेत मूळ कायद्यातच बदल करत नवीन खुल्या किंवा आवाजी मतदानानं मतदान घ्यावे असा कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
(हेही वाचाः सरकारचा आमदारांवर विश्वास नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी घेण्याचा घाट!)
Join Our WhatsApp Community