-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची आघाडीची फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आणि पहिले चार फलंदाज फक्त ५४ धावांत तंबूत परतले. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्या तेज माऱ्यासमोर विराट कोहलीसह (Virat Kohli) सर्वच भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही. यात विराटचं अपयश आणखी उठून दिसणारं आहे. कारण, पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर तो बाद झाला आहे. आणि फलंदाजीतील एका तांत्रिक चुकीचा फटका त्याला वारंवार बसताना दिसत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अवसानघातकी फटका खेळत विराट (Virat Kohli) पुन्हा एकदा बाद झाला. यामुळे सोशल मीडियावर तर टीका होतेच आहे, शिवाय माजी खेळाडूही विराटला लक्ष्य करताना दिसत आहेत.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) विराटबरोबर आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेला आहे. त्याने विराट (Virat Kohli) नवीन चेंडू खेळण्यासाठी बनलेला नाही, अशी टिप्पणी केली आहे. ही एकप्रकारे त्याच्या तंत्रावर केलेली टीकाच आहे. ‘विराटचं फलंदाजीचं तंत्र हे नवीन चेंडूसाठी बनलेलं नाही. तो निदान पंधराव्या षटकाच्या नंतर फलंदाजीला यायला हवा. तितका वेळ आघाडीचे फलंदाज खेळून काढू शकले, तर विराट पुढे चांगली फलंदाजी करू शकेल. मालिकेत एकदा तो उशिरा फलंदाजीला आला तर त्याने लगेच शतक ठोकलं. ही आकडेवारी खूप काही सांगून जाते,’ असं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.
(हेही वाचा – संसद टीव्हीप्रमाणे विधिमंडळ टीव्ही सुरू करणार; Rahul Narvekar यांची माहिती)
जोश हेझलवूडचा (Josh Hazlewood) सहाव्या यष्टीबाहेरून जाणारा चेंडू खेळताना विराट ३ धावा करून बाद झाला. असे चेंडू न खेळण्याची संयम विराटला दाखवता येत नाहीए. आणखी एक माजी भारतीय खेळाडू दीप दासगुप्तानेही याच चुकीवर बोट ठेवलं आहे.
Spot on, Deep Dasgupta
“Forget your fav shot cover drive for early 20-30 balls”
You need to keep this “I’ve made all my runs like that” ego aside sometimes & time demands revolution, and it’s that time.@imVkohli pic.twitter.com/FfIRMjpFa1
— POTT⁷⁶⁵ (@KlolZone) December 16, 2024
(हेही वाचा – Crime : पतीला तुरुंगातून सोडवण्यासाठी तीने चक्क सव्वा महिन्याच्या मुलीची केली विक्री)
विराटची समस्या ही मानसिक आहे, असं दासगुप्ताला वाटतं. ‘विराट (Virat Kohli) काय क्षमतेचा खेळाडू आहे हे मागची १०-१५ वर्षं सगळ्यांनी पाहिलं आहे. आता विराटने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नाही तर स्वत:साठी खेळावं. किमान पहिले २० चेंडू विराटने ड्राईव्हचा फटका मारू नये. एकदा चेंडू थोडा जुना झाला की तो मनासारखा खेळण्यासाठी तयार होऊ शकतो,’ असं दासगुप्ता स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना म्हणाला.
याआधी भारतातील न्यूझीलंड विरुद्धची मालिका आणि आता बोर्डर – गावसकर मालिकेतही विराटच्या धावा म्हणाव्या तशा होत नाहीएत. तो या मालिकेत ५, नाबाद १००, ७, ११ आणि ३ अशा धावा करून बाद झाला आहे. फलंदाजांच्या अपयशाचं दडपण मग गोलंदाजांवर येत आहे. आताही ब्रिस्बेन कसोटी वाचवण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित दोन दिवस खेळून काढावे लागणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community