भविष्यात महापालिकेच्याही आय.बी. शाळा असतील! आदित्य ठाकरे यांची घोषणा

दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

187

भविष्यकाळात मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आयबीच्या शाळा सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध

पवई, कुर्ला(पश्चिम) तुंगा व्हिलेज येथील मुंबई महापालिकेच्या सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित शुक्रवारी पार पडले. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी पवई, कुर्ला(पश्चिम) तुंगा व्हिलेज येथील ३६० विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे आलेले १ हजार ९२८ अर्ज हे मुंबई महापालिकेच्या दर्जेदार शिक्षणाचे द्योतक असून, यापुढील काळातही दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले.

IMG 20210716 WA0133

(हेही वाचाः महापालिकेचा कळस मजबूत, पाया कमजोर)

ही आनंदाची गोष्ट

महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले ही सर्वसाधारण कुटुंबातील असून, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने सीबीएसई-आयसीएसई शाळा मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत. या सीबीएसई- आयसीएसई शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मिळत असलेला प्रवेश, हा मनस्वी आनंद देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

IMG 20210716 WA0129

शिक्षण सहआयुक्तच गायब दिसले नाहीत!

महापालिकेचे सहआयुक्त असलेल्या आशुतोष सलिल यांच्याकडे शिक्षण विभाग आहे. प्रविणसिंह परदेशी आयुक्त असताना त्यांनी उपायुक्तांकडे असलेले शिक्षण विभाग सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडे सोपवले आणि त्यांच्यावरील अतिरिक्त आयुक्तांची जबाबदारी काढून घेत, त्यांना आयुक्तांच्या थेट अधिपत्याखाली आणले होते. परंतु काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्तांकडील विभाग आणि खात्यांची जबाबदारी नव्याने सोपवली आहे. यामध्ये शिक्षण विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली. त्यामुळे सहआयुक्त आशुतोष सलिल हे अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली पुन्हा आल्याने काहीसे नाराज आहेत. त्यामुळे एरव्ही आदित्य ठाकरे यांच्याभोवती पिंगा घालणारे सलील पवईतील या शाळेच्या लोकार्पण प्रसंगी कुठेही दिसले नाहीत. आदित्य ठाकरे असताना त्यांचे गायब होणे हे विभागातील अधिकाऱ्यांना आश्चर्यचकीत करणारे आहे.

IMG 20210716 WA0132

याप्रसंगी आमदार दिलीप लांडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थानिक नगरसेविका अश्विनी माटेकर, शिक्षण समितीचे शिवसेना सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, झकारिया आदी सदस्यांसह शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे आदी उपस्थित होते.

(हेही वाचाः मुंबईत तलाव भरण्याचा श्रीगणेशा झाला… ‘हे’ तलाव भरले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.