महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना काळातील मागील दीड वर्षांची मरगळ झटकून पक्ष बांधणीसाठी कृष्णकुंजच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तसेच नाशिकचा पहिला दौराही आखला. राज्यातील ९ महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असताना राज ठाकरेही उत्साहाने सुरुवात करणार असतानाच त्यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.
मनसेचा ‘युथ’ चेहरा सेनेला मिळाला!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील तरुण चेहरा म्हणून ओळखला जाणारे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी, १६ जुलै रोजी शिवसेनेत प्रवेश करून हातावर शिवबंधन बांधून घेतले आहे. हा मनसेला जबरदस्त धक्का मानला जात आहे. आदित्य शिरोडकर यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक मनसेमधून लढवली होती. आदित्य शिरोडकर हे राजन शिरोडकर यांचा मुलगा असून राजन शिरोडकर आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
(हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाकडून शिरसाटांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम! महापौर, अध्यक्षांना दणका!)
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला फटका!
कोहिनुर प्रकरणात ईडीच्या चौकशीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राजन शिरोडकर यांचीही चौकशी झाली होती. त्यानंतर आदित्य शिरोडकर पक्ष कार्यात विशेष सक्रिय दिसले नाही. आता आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश होणे हा शिवसेनेची ताकद वाढवणारा आणि मनसेला जबरदस्त धक्का समजला जातो.
Join Our WhatsApp Community