‘प्लॅटिनम’ धातूसाठी इको कारचे सायलेन्सर चोरणाऱ्या एका टोळीचा कळवा पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीला पोलिसांनी कुर्ला परिसरातून अटक केली असून, त्यांच्याकडून २५ सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. या टोळीवर ठाणे आणि पुणे जिल्ह्यात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
करत होते सायलेन्सरची चोरी
शमशुद्दीन मोहम्मदअदिस शहा (२१), नदीम उर्फ नेपाळी नवाब कुरेशी (२२), शमसुद्दीन खान (२२) सद्दाम खान (२६) असे अटक करण्यात आलेल्या सायलेन्सर चोरांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले चौघेही कुर्ला पश्चिम सीएसटी रोड या परिसरात राहतात. सीएसटी रोड येथे वाहनांचे सुटे भाग विकता विकता, त्यांना वाहनांचे सुटे भाग काढून चोरी करण्याची कल्पना सुचली होती. त्यातच इको कारला कंपनीकडून फिट होऊन येणारे सायलेन्सरमध्ये प्लॅटिनम असल्यामुळे ही टोळी इको कारच्या सायलेन्सरची चोरी करू लागली होती. ठाणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत तसेच एकट्या कळव्यात तीन इको कारचे सायलेन्सर चोरी झाल्याच्या घटनांची नोंद झाली होती.
ठाणे आणि पुण्यात २५ गुन्हे दाखल
इको गाडीच्या शेजारीच महागड्या मोटारी असून देखील, केवळ इको कारचे सायलेन्सर चोरीला गेल्यामुळे कळवा पोलिस ठाण्यातील अधिकारी देखील चक्रावले होते. या चोरांचा माग काढण्याचे ठरवून कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत चौधरी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकांना आरोपींचा माग काढण्याची सूचना दिली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे शिरीष यादव, सहाय्यक पो.उ.नि. डी.जी.देसाई यांच्या पथकाने आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. तसेच खबऱ्यांच्या मदतीने अखेर पोलिस पथक आरोपींच्या कुर्ल्यातील घरापर्यंत दाखल होऊन, चारही जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत त्यांनी पुणे, पुणे ग्रामीण, ठाणे शहरातील विविध ठिकाणी मागील ६ महिन्यांत २५ पेक्षा अधिक इको कारचे सायलेन्सर चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिस पथकाने या टोळीकडून २५ सायलेन्सर जप्त केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
अशी होती गुन्ह्याची पद्धत
ही टोळी मुंबईत कुठेही चोरी करत नव्हती. कारण मुंबईत चोरी केल्यास पकडले जाऊ याची भीती या टोळीला होती. म्हणून या टोळीने ठाणे आणि पुण्यात चोरी करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर पार्क असणाऱ्या इको कारला हेरून ही टोळी रात्री-बेरात्री या कारचे काही मिनिटांत सायलेन्सर काढून चोरी करत असे. सायलेन्सर चोरी करण्यापूर्वी सायलेन्सर ओरिजनल आहे का हे तपासूनच ते चोरी करत होते, अशी माहिती यादव यांनी दिली. एका दिवसात साधारण तीन ते चार सायलेन्सर चोरी करुन या सायलेन्सरचा ड्रम ते वेगळा करत होते. त्या ड्रममधील जाळीत असणाऱ्या माती मिश्रित प्लॅटिनम वेगळे करण्यासाठी ती माती भट्टीत गरम करुन, त्यातून प्लॅटिनम वेगळे करुन पुन्हा तो ड्रम सायलेन्सरला गॅस वेल्डिंगच्या साह्याने जोडून, त्या सायलेन्सरची कुर्ल्यातील सीएसटी रोड येथे विक्री करत होते.
१ ग्राम प्लॅटिनमची किंमत साधारण २ हजार
एका सायलेन्सर मधून साधारण १० ग्राम प्लॅटिनम या टोळीला मिळत होते. सध्या बाजारात प्लॅटिनमची १ ग्राम किंमत २ हजार रुपये असल्याची माहिती तपास अधिकारी यादव यांनी दिली. इको गाडीचा सायलेन्सर बाहेरुन गरम होऊ नये, म्हणून प्लॅटिनम मिश्रित माती लावून त्याला जाळीने बंद केले जाते. खूप कमी लोकांना याची माहिती असल्याचे तपास अधिकारी शिरीष यादव यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community