- ऋजुता लुकतुके
रोहित शर्माचा खराब फॉर्म ऑस्ट्रेलियातही त्याची साथ सोडत नाहीए. पहिली पर्थ कसोटी तो खेळला नाही. पण, त्यानंतरच्या ३ डावांमध्ये त्याने अनुक्रमे ३, ६ आणि १० धावा केल्या आहेत. शिवाय फलंदाजीला सलामीला यायचं की, मधल्या फळीत हे ही अजून त्याचं ठरत नाहीए. अशावेळी सुनील गावस्कर यांनी रोहितविषयी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ‘मेलबर्न आणि सिडनी या उर्वरित कसोटींमध्ये तो अपयशी ठरला तर निवृत्तीसाठी तो बीसीसीआयने सांगण्याची वाट बघणार नाही. रोहित स्वत:च निवृत्त होईल,’ असं सुनील गावस्कर यांनी बोलून दाखवलं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या ‘गुगल करा’ उत्तराला गुगलनेही दिला प्रतिसाद)
पहिल्या पर्थ कसोटीत मुलाच्या जन्मासाठी घेतलेल्या सुट्टीमुळे रोहित खेळला नाही. तोपर्यंत के. एल. राहुलने सलामीला चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे पुढील ॲडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीत रोहित सहाव्या क्रमांकावर खेळला. पण, तिथेही त्याची फटक्यांची निवड आणि चेंडूचा घेतलेला अंदाज चुकीचा ठरला. तो तीन डावांमध्ये मिळून फक्त १९ धावा करू शकला आहे. त्यामुळे विराट बरोबरीच रोहितवरही टीका होत आहे. शिवाय रोहितचे कर्णधार म्हणूनही मैदानावरील काही निर्णय टीकेचे धनी ठरले आहेत. भारताच्या या दोन दिग्गज खेळाडूंची निवृत्तीची वेळ जवळ आली आहे का, अशी चर्चा सुरू असताना गावस्करांनी आपलं मत नोंदवलं. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा – Thane Gold theft: ठाण्यातील दागिन्यांच्या दुकानात चोरी; 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले)
‘रोहित मनस्वी खेळाडू आहे. भावनाशील आहे. संघावर ओझं होऊन राहणं त्याला आवडणार नाही. त्याच्याकडे मेलबर्न आणि सिडनीच्या रुपात दोन संधी आहेत. तिथेही तो अपयशी ठरला तर तो नक्कीच काहीतरी निर्णय घेईल. भारतीय क्रिकेटच्या भल्याचा विचार करण्याइतका विचारी क्रिकेटपटू तो आहे,’ असं गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलून दाखवलं. तर ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारानेही रोहितच्या फलंदाजीवर आपलं मत व्यक्त केलं. ‘रोहितने मधल्या फळीत येऊन स्वत:वरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्याचा स्वत:वरच विश्वास नाही, असं यातून दिसतं. फलंदाज म्हणून नेहमी सलामीला आलेल्या फलंदाजासाठी सहाव्या क्रमांकावर खेळणं सोपं नाही,’ असं पुजारा म्हणाला. बोर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न इथं होणार आहे. मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community