Veer Savarkar : मनुस्मृतीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप अज्ञानाचे लक्षण

सावरकरांवर (Veer Savarkar) जितके आरोप करत राहतील तितका काँग्रेसचा अंत जवळ येईल, तो ठेका राहुल गांधींनी घेतला आहेच.

43
  • मंजिरी मराठे

द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांचे अंगठे कापले, अशी बुद्धी असणारे राहुल गांधी, संसदेत पुन्हा एकदा सावरकरांवर घसरले. सावरकरांच्या पुस्तकातलं एखादं वाक्य घ्यायचं आणि आरोप करायचे हा सावरकर विरोधकांचा नेहमीचा खेळ आहे. आताही त्यांनी तेच केलं आहे.

“वेदांच्या खालोखाल आपल्या हिंदु राष्ट्राचा अत्यंत पूज्य आणि आपल्या संस्कृतीचा, आचारांचा आणि व्यवहाराचा प्राचीन काळापासून आधारस्तंभ होऊन बसलेला असा जर कोणचा ग्रंथ असेल तर तो मनुस्मृती हाच होय. आपल्या राष्ट्राच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनयात्रेचे नियमन शतकानुशतके हा ग्रंथच मुख्यतः करीत आलेला आहे. आजही कोट्यवधि हिंदु ज्या निर्बंधान्वये (कायद्याने) आपले जीवन आणि व्यवहार घालवीत आणि चालवीत आहेत ते निर्बंध (कायदे) तत्वतः तरी मनुस्मृतीवरच आधारलेले आहेत. मनुस्मृती हीच आजही तत्वतः हिंदु निर्बंध (हिंदु लॉ) आहे.”

(हेही वाचा Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान )

सावरकरांनी (Veer Savarkar) हे वाक्य ‘प्राचीन आणि अर्वाचीन महिला’ या लेखात सुरुवातीला लिहिलं आहे.

मनुस्मृतीला हिंदू लाॅ मानण्याचा प्रघात होता, हेच त्यांनी या वाक्यातून सांगितलेलं आहे, ते त्यांचं मत नव्हे. त्या लेखात त्यांनी आपली मतं वारंवार मांडली, त्यातील काही वाक्य अशी…

१)”मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखविणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे – याच नात्याने काय तो या लेखात आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत.”

२) “मनुस्मृतीच्या काळच्या ज्ञानानुरुप, त्यांनी सुचले ते सिद्धान्त लिहिले. दोन हजार वर्षात मनुष्याचा अनुभव वाढून, प्रयोगान्ती अधिक तथ्य नियम सापडताच ते स्वीकारून पूर्वीची चुकीची मते सोडून देणे हेच प्रगतीचे लक्षण. पूर्वजांच्या ज्ञानात भर टाकणे हाच पूर्वजांनाही इष्ट वाटेल असा पूर्वजांचा खरा अभिमान होय. ह्या अद्ययावत्पणातच हिंदु राष्ट्राचे खरे कल्याण साधून जगाच्या पुढे दोन पावले जाण्याची धमक त्यात उत्पन्न होऊ शकणारी आहे. पण मनूस त्रिकालाबाधित मानण्याच्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्तीने दोन हजार वर्षापूर्वीच्या विज्ञानाच्या मागासलेल्या स्थितीतून आपले पाऊल पुढे पडण्याची शक्यताच खुंटते.”

३) “राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत राष्ट्रधारणास जो श्लोक उपयुक्त वाटेल तो, मनूचा असो, प्रक्षिप्त असो, तो आम्ही आचरू; जेथे तो परवडणार नाही तेथे राष्ट्रहितसाधक असे अद्ययावत् ज्ञानाच्या कसोटीस उतरणारे नवीन निर्बंध करू.

४) कोणचाही श्लोक मूळचा म्हणून चांगला, प्रक्षिप्त म्हणून वाईट वा स्मृतीतला म्हणूनच अनुल्लंघ्य असे आम्ही मानीत नाही; तर आजच्या राष्ट्रीय परिस्थितीत हितकारक असेल तर मानतो, नाहीतर तसा हितकारक तो नवीन निर्बंध नवीन म्हणून चक्क सांगून स्वीकारतो. विज्ञाननिष्ठ, प्रत्यक्षनिष्ठ, अद्ययावत् प्रवृत्ती हीच. ह्याच प्रवृत्तीने नि ह्याच ऐतिहासिक दृष्टीने मनुस्मृति वाचायला हवी.

सावरकर (Veer Savarkar) हे बुद्धिवादी होते, विज्ञाननिष्ठ होते

सप्टेंबर १९३४ मध्ये किर्लोस्कर मधल्या लेखात सावरकर (Veer Savarkar) लिहितात,
”ही प्राचीन श्रुतिस्मृतिपुराणादि शास्त्रें ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवून, आता विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. या ग्रंथांचा काल काय झाले हे सांगण्यापुरता अधिकार; आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ – अद्यतन विज्ञानाचा! या अद्ययावत पणात मागच्या सर्व अनुभवांचे सारसर्वस्व साभावलेले असतेच … श्रुतिस्मृतिपुराणादि हे सारे ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने सन्मानतो; पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यांचे सारे अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि नंतर राष्ट्रधारणास, उध्दारणास, जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार! म्हणजेच आम्ही अद्ययावत बनणार, अप्-टु-डेट बनणार …”.

हे वाचलं तर कोणीही शहाणा माणूस सावरकरांवर (Veer Savarkar) आरोप करू धजणार नाही. राहुल गांधींच्या ‘भारत तोडो’ यात्रेत ते सतत सावरकरांवर आरोप करत होते. तेव्हा त्यांना सावरकरांवर आरोप करून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका अशी कोणी समज दिली असावी त्यामुळे काही काळ ते गप्प होते. महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेसकडे आता मांडण्यासारखा काही मुद्दा नाही, असं झालं की काँग्रेसी सावरकरांवर आरोप करू लागतात. चांगलं आहे, सावरकरांवर (Veer Savarkar) जितके आरोप करत राहतील तितका काँग्रेसचा अंत जवळ येईल, तो ठेका राहुल गांधींनी घेतला आहेच.

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.