तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ; DCM Eknath Shinde यांची ग्वाही

42
तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ; DCM Eknath Shinde यांची ग्वाही
  • नागपूर, प्रतिनिधी

महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची असून गेली अडीच वर्षे महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केलं. गेल्या अडीच वर्षात विक्रमी कामं झाली. एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.

(हेही वाचा – Parliament Winter Session : संसदेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित; राहुल गांधींच्या गुंडगिरीमुळे भाजपा खासदार रुग्णालयात दाखल)

अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन

गेली अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं. त्यामुळेच आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार झालं. जनतेच्या विश्वासामुळं आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझं धोरण गतिमान विकास हेच होतं तिथं पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही. तरी पण माझ्यावर टीका झाली पण मी त्याला कामातूनच उत्तर दिलं, असही त्यांनी यावेळी ठासून सांगितले.

विकास कामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार

गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) यावेळी दिली.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy : भारतीय संघ ब्रिस्बेन मधून मेलबर्नला रवाना)

विदर्भ विकासासाठी ठोस पावले

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, माझे विदर्भाशी माझं वेगळं नातं आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंदच असून गेल्या दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणामही दिसू लागलेत. समृद्धी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कमही आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसीत करायचा आहे. विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. गेल्या अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अग्रेसर महाराष्ट्र

गेल्या अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. विक्रमी विकासकामं झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारं पहिलं राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारं पहिलं राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारं पहिलं राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारं पहिलं राज्य आणि सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) सांगितले.

(हेही वाचा – Amol Kirtikar यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; वायकरांची खासदारकी कायम)

महाराष्ट्रात १० लाख कोटींच्या पायाभूत सुविधांची काम

महाराष्ट्रात १० लाख कोटींच्या पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला आम्ही मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करतोय. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असं आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) सांगितले.

एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. त्यासाठी आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देतोय. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य करायचं आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) यावेळी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.