Mumbai BEST Buses : आता बस झाले, मुंबईकरांना बेस्ट शब्द उच्चारताना लाज वाटू देऊ नका!

480
Mumbai BEST Buses : आता बस झाले, मुंबईकरांना बेस्ट शब्द उच्चारताना लाज वाटू देऊ नका!
  • सचिन धानजी

कुणी दिले तरी ते खाता येत नाही आणि आपल्याकडे आहे ते टिकवता येत नाही, अशी काहीशी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाची अवस्था आहे. खरेतर कुर्ला येथे जो बेस्ट बसच्या वेट लिजवरील बसेसने माणसांना आणि गाड्यांना चिरडून ठार केले, तो प्रकार पाहता असा प्रकार केव्हा ना केव्हा होणार होता, तो अखेर घडला आणि बेस्टसह सर्वांचेच डोळे उघडले. पण हे नुसते डोळे उघडून उपयोग आहे का? यातून जर का उपक्रम बोध घेणार असेल आणि त्यातून जर ते सुधारणा करून बेस्टची बस वाहतूक खासगी कंपन्यांकडून सेवा घेणार असतील तर ठीक. नाही तर ये रे माझ्या मागल्या. दोन-चार दिवस या घटनेवर शोक व्यक्त करायचा, भीती व्यक्त करत विरोधकांनी आगडोंब उसळवून वातावरण तापवायचे या पलीकडे काहीच नाही. प्रत्यक्षात बेस्टमधील बस सेवेमध्ये जी सुधारणा आणि सुसुत्रता आवश्यक आहे, ती जर घडणार नसेल, तर अशा प्रकारच्या घटना आज काय आणि भविष्यात घडल्या, तरी काही उपयोग नाही. याचा अर्थ बेस्ट उपक्रम हा निगरगठ्ठ आणि खापऱ्या काळजाचा झाला असून मुंबईकरांचे बळी चढवत त्यांना बेस्टला पुन्हा चांगले दिवस आणायचे आहे असे म्हणता येईल. (Mumbai BEST Buses)

(हेही वाचा – Dr. Ambedkar प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने)

बेस्ट उपक्रमाच्या विद्यमान ताफ्यांमध्ये २,०८१ भाडे तत्वारील बस गाड्यांसहित ३,१६६ बसगाड्यांचा ताफा आहे. बेस्टच्या मालकीचा ताफा हा केवळ १०८८ एवढा आहे. बेस्ट प्रशासनाने आपल्या मालकीचा ३३३७ गाड्यांचा ताफा कायम ठेवून भाडेतत्वावरील खासगी बसेस अर्थात वेट लिजवरील बसचा ताफा वाढवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु वेट लिजवरील वाहनांची सेवा घेताना आपल्या कायम बसेसचा ताफा कमी करण्यावर प्रशासनाने दिला आहे. मुंबईकरांना चांगली आणि नियोजित वेळेत सेवा म्हणून खासगी बसेसचा पर्याय ठीक असला, तरी आपल्या बाळाचा जीव घेऊन दुसऱ्याच्या बाळाला जीवनदान देणे हे योग्य नाही. आज बेस्ट प्रशासन स्वत:च्या गाड्या कमी करून पर्यायाने आपल्या कायम कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची पदे कशाप्रकारे रद्द करता येतील यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणजे आज स्वत:चा गाड्यांचा ताफा कमी केला की, पर्यायाने स्वत:च्या कायम कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना देण्यात येणारे अधिकचे मानधन, निवृत्त वेतन, ग्रॅच्युटीसह इतर कोणत्याही भत्त्यांचा लाभ द्यावा लागणार नाही. बेस्टवरील आस्थापना खर्च कमी करता येईल, हा जर विचार असेल, तर बेस्टसाठी घातक आहे. बेस्ट खासगी बसेसची सेवा घेत असली, तरी त्यांच्या चालकांमध्ये बेस्टच्या कायम चालक आणि वाहकांप्रमाणे प्रवाशांबाबतची आपुलकी आणि प्रेमाची भावना नाही. वेट लिजवरील बस गाड्यांच्या चालकांची निष्ठा ही किलोमीटरशी असून कंपनीने निश्चित केलेल्या किलोमीटरप्रमाणे गाडी धावून दिवसाचा मीटर पूर्ण पडेल, याची काळजी ते घेत असतात. त्यामुळे बस स्थानकावर प्रवासी उभे असूनही बऱ्याचदा रिकामी बस समोरून निघून गेल्याचे दिसते. खासगी बसेसचा चालक हा विशेषत: रिकाम्या बसेस बस थांब्यावरून भरघाव वेगाने घेऊन जात असल्याने बेस्टकडे येणारा प्रवासी पण नाईलाजाने खासगी रिक्षा नाही टॅक्सी किंवा शेअर रिक्षा व टॅक्सीकडे वळतो. आज लक्ष्मी दारात उभी असताना बेस्टचे चालक जर अशा प्रवाशांकडे पाठ फिरवून जात असेल, तर बेस्टच्या आर्थिक स्थितीचा उतरणाऱ्या आलेखाला हेच जबाबदार आहेत. (Mumbai BEST Buses)

(हेही वाचा – भाजपाचे डॅशिंग आमदार Ram Kadam यांचा हल्लाबोल; म्हणाले, काँग्रेसला बाबासाहेबांबद्दल…)

एका बाजूला २०२५-२६ या वर्षांपर्यंत उपक्रमाच्या बसताफ्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश करणे आणि त्यानंतरच्या वर्षामध्ये सदर इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या संख्येमध्ये ८००० पर्यंत वाढविणे हे बेस्ट वाहतूक विभागाचे उद्दिष्ट असले, तरी प्रत्यक्षात पूर्वीच्या इंजिनवरील गाड्या आणि आताच्या इलेक्ट्रिक आधारित वाहने चालवण्याचा अनुभव हा खासगी कंपनीच्या चालकांना आहे का? मुळात कुर्ला येथे जो अपघात झाला, त्या बसमध्ये कुठलाही तांत्रिक दोष नव्हता, असा निष्कर्ष आरटीओ विभागाने नोंदवला आहे. मग दोष कुठे होता, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या इंजिनवरील बस गाड्या आहेत, त्या गाड्यांचे किमान दोन ते तीन महिने प्रशिक्षण चालकाला देणे आणि तो योग्य प्रकारे चालवतो किंवा नाही याची खातरजमा झाल्यानंतर त्यांना बस चालवण्यासाठी नियुक्त करणे हा नियम असतो. या बसगाड्या अत्याधुनिक आहेत, त्यांचे गियरपासून ब्रेक वेगळ्याप्रकारचे आहेत. बरं आम्ही असेही ऐकले की, याचा ब्रेक फेल होत नाही आणि काही झाले, तर तातडीने ब्रेक लागतो. मग कुर्ल्याच्या घटनेत तसे काही दिसले नाही. म्हणजे खासगी कंपन्या ज्या ओलाच्या चालकांना, मग चारचाकी वाहने चालवणारे असतील किंवा टेम्पो चालवणारे असतील, तर त्यांना कामावर रुजू करून घेऊन त्याला ती बस चालवता येते, याचा एक व्हिडिओ काढून बेस्टच्या अधिकाऱ्यांना दाखवून नियुक्ती करून घेतात. त्यामुळे बेस्टच्या धर्तीवर खासगी कंपनीच्या वतीने चालकांना नवीन बसेसचे प्रशिक्षण दिले जावे आणि त्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी बेस्टच्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले जावे. बेस्टचे अधिकारी स्वत: सर्व खातरजमा करत नाहीत, तोवर खासगी कंपनीच्या चालकांना बसेस चालवण्यास परवानगी देऊ नये, अशा प्रकारचा नियम होण्याची गरज आहे. (Mumbai BEST Buses)

(हेही वाचा – Ashwin Retires : ‘अपमानास्पद वागणुकीमुळे अश्विनची निवृत्ती’, वडिलांचं खळबळजनक विधान; अश्विनने केली सारवासारव)

मुळातच बेस्ट समितीमध्ये यापूर्वी हंसा, एमएमटी, मातेश्वरी, टाटा आणि स्विच या संस्थेपैकी काही संस्थांचे प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये तर काहींचे प्रस्ताव प्रशासन नियुक्त महाव्यवस्थापकांनी मंजूर केले. बेस्ट समितीमध्ये जेव्हा हे प्रस्ताव घाईघाईत मंजूर केले जात होते, तेव्हा या संस्थेकडून चालकाला बेस्ट बसेसचा अनुभव असेल का? त्यांच्याकडून अपघात वगैरे झाला, तर त्याला जबाबदार कोण? त्यांनी पुढे येवून सर्वांनी आंदोलन करून सेवा ठप्प केली, तर त्यावर उपाय काय अशा प्रकारचे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांची उकल आता होत आहे. कुर्ल्यांतील बस अपघाताची जबाबदारी कुणाची यावरून खलबते सुरु आहेत. मात्र, आज अपघातामुळे बेस्टमधील खासगी बसेसची सेवा बंद करण्याची मागणी होत असली, तरी मागील वर्षी एप्रिल महिन्यात या सर्व खासगी कंपन्यांच्या चालकांनी एकत्र येत काम बंद आंदालन केले होते. तब्बल आठ दिवस हे आंदोलन सुरु होते आणि शेवटी बेस्टला आपल्या चालकांच्या हाती बसचे स्टेअरींग देत सेवा अविरत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागला होता. त्यामुळे या संस्थांच्या चालकांकडून अशा प्रकारे दरवर्षी पगारवाढीच्या मुद्दयावरून जर मुंबईकरांना वेठीस धरले जाणार असेल, तर अशा खासगी संस्थांची गरज का? बेस्टला खासगी बसेसची सेवा न घेता खासगी बसेसच्या आधारे वाहतूक सेवा सुरुळीत ठेवता येण्यासारखे आहे. यासाठी ५० टक्के वाहने रिंग रुटसाठी आणि २५ टक्के वाहने छोट्या पल्ल्याच्या मार्गावर आणि २५ टक्के वाहने जर लांब पल्ल्याच्या मार्गावर सुरु केल्यास याचा फायदा बेस्टला होऊ शकतो. आज मुंबईकरांना रेल्वे स्थानक ते आपल्या घरापर्यंतची सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे आज जे प्रवासी शेअर रिक्षा आणि टॅक्सीकरता १५ ते २० रुपये मोजतात, त्यांना जर या सहा रुपयांमध्ये सेवा मिळाली, तर ते निश्चितच बेस्टकडे वळतील. आम्हाला तेही करायचे नाही. बेस्टच्या सर्व गाड्या या वातानुकुलित असून त्यांचे किमान भाडे सहा रुपये आणि त्याच ठिकाणी शेअर रिक्षा आणि टॅक्सीतून १० ते १५ रुपये किंवा २० रुपयांमध्ये कोंबून नेले जाते, त्यात एसीही नसतो. मग बेस्टने उद्या याचे भाडे किमान १० रुपये केले, तरी हे प्रवाशी बेस्टकडे येतील. आज जेवढा विश्वास प्रवाशांचा बेस्टच्या बसेसवर आहे, तेवढा विश्वास खासगी आणि शेअर रिक्षा व टॅक्सीवर नाही. त्यामुळे या विश्वासार्हतेचा फायदा बेस्टला घ्यावा लागेल. पण आमचा कर्मदरिद्रीपणाच आम्हाला पुढे जाऊ देत नाही, त्याला आम्ही काय करणार? त्यामुळे आता जे झाले ते बस झाले, आता सुधारा नाहीतर बेस्ट हा शब्दच मुंबईकरांना उच्चारताना लाज वाटेल. (Mumbai BEST Buses)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.