शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करणार; DCM Eknath Shinde यांचे स्पष्टीकरण

36
शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करणार; DCM Eknath Shinde यांचे स्पष्टीकरण
  • नागपूर, विशेष प्रतिनिधी

शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिकच असून काहीजणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कुणी नाराज आहे असे होत नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्या सोबतच असून त्यांच्यापैकी कुणीही नाराज नाही. यापुढेही सगळेजण मिळून शिवसेनेमध्ये एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज झाले होते. त्यात विजयबापू शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी या तिघांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शुक्रवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली.

यावेळी बोलताना, सरकार म्हणून काम करताना काही वेळा पदे येतात आणि जातात, मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्त्वाचे आहे. जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद वाटते त्याचप्रमाणे विजयबापू शिवतारे यांना एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांचा विश्वासू सहकारी हे पद महत्त्वाचे आहे असे त्यांनी मला सांगितले. आम्ही सारे शिवसेना नावाच्या कुटुंबाचा भाग असून या परिवारापासून कुणीही वेगळे होणार नाही असेही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी ठामपणे स्पष्ट केले. आज इथे नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार उपस्थित असून यापुढेही ते पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करतील असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

(हेही वाचा – Hindu Janajagruti Samiti : देव, देश, धर्म आणि मंदिरे रक्षणासाठी महायुती सरकार कटिबद्ध; मंत्री आणि आमदार यांची ग्वाही !)

शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी

कल्याणमधील सोसायटीत मराठी कुटुंबासोबत घडलेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणी कसे रहावे आणि काय खावे यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही तसे करणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिवीगाळ करून मराठी कुटुंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही असेही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी निक्षून सांगितले.

बीड येथील घटनेत कुणालाही पाठीशी घालणार नाही

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही अत्यंत अमानुष असून माणुसकीला काळिमा फासणारीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत शुक्रवारी सभागृहात विस्तृतपणे आपले म्हणणे मांडले असून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. त्याचवेळी तपासासाठी एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. या प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला आणि कुणाच्याही जवळचा असला तरीही त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असा सक्त इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी यावेळी बोलताना दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.